पिंपरी, दि. १९ :- क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा सखोल वेध घेत शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, जातीभेद निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांवर आधारित समाजरचनेची आवश्यकता अधोरेखित करताना, या महापुरूषांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता ‘समग्र महात्मा फुले’ या परिसंवादातून स्पष्ट करण्यात आली. तसेच त्यांचे साहित्य, कार्य आणि चळवळींमधून उभ्या राहिलेल्या मानवतावादी दृष्टिकोनाचा स्वीकार करून सामाजिक न्यायाची वाट अधिक बळकट करण्याचा संदेश परिसंवादातून देण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताह व ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ मध्ये समारोपीय कार्यक्रमात ‘समग्र महात्मा फुले’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये विविध मान्यवर वक्त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा, साहित्याचा आणि त्यांच्या सामाजिक विचारांचा सखोल आढावा घेत समाजपरिवर्तनातील त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
या परिसंवादात साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, माजी आमदार अँड. जयदेव गायकवाड, फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश पवार सहभागी झाले होते. यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ संध्या हरिभक्त, डॉ सुजाता नांगरे, ग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वार, राजू मोहन, कामगार नेते निवृत्ती आरवडे, तुकाराम गायकवाड, गणेश भोसले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी महापुरुषांनी संत साहित्य आत्मसात करून समाजपरिवर्तनासाठी कसे प्रयत्न केले, यावर प्रकाश टाकला. महात्मा फुले हे त्यापैकी एक प्रभावी व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडवले, असे त्यांनी नमूद केले. मराठी भाषेच्या जतनात फुले यांच्या साहित्याचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांमधून प्रेरणा घेतल्याचेही स्पष्ट केले. फुले यांच्या लिखाणातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना ‘तिसरे गुरू’ का मानले, याची जाणीव होते, असे ते म्हणाले. आजच्या पिढीने त्यांच्या साहित्याचे वाचन करून त्यातील विचार आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ यांसारख्या ग्रंथांमधून महात्मा फुले यांनी तत्कालीन व्यवस्थेवर केलेल्या प्रखर प्रहाराचे विवेचन केले. त्या काळातील सामाजिक विषमता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यावर भाष्य करत त्यांनी फुले यांनी पुणे व महाराष्ट्रातील प्रस्थापित व्यवस्थेला थेट आव्हान दिल्याचे सांगितले. ‘तृतीय रत्न’ या नाटकासह त्यांनी केलेले साहित्यलेखन हे सामाजिक बदलासाठी प्रभावी साधन ठरले, असेही त्यांनी नमूद केले. जातीभेद निर्मूलनासाठी फुले आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य सर्वसमावेशक असून या महान व्यक्तिमत्त्वांना कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार अँड. जयदेव गायकवाड यांनी महात्मा फुले यांच्या कार्यातील मानवतावादी दृष्टिकोन अधोरेखित केला. संपूर्ण देशातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली, असे ते म्हणाले. त्यांच्या वाड्यातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करून त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा उभारला. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून ३५ बालकांचे संगोपन करण्यात आले, ही त्यांची संवेदनशीलता अधोरेखित करणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या विचारांचा प्रभाव पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीवरही दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले.
फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे व्यापक आणि वैश्विक स्वरूप स्पष्ट केले. ‘गुलामगिरी’ या ग्रंथाने भारतीय समाजातील क्रांतीचे बीज रोवले, असे सांगत त्यांनी फुले यांच्या कार्याचा इतिहास अधिक व्यापकपणे मांडण्याची गरज व्यक्त केली. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमुळे समाजात जागृतीची चळवळ निर्माण झाली आणि सामाजिक क्रांतीची ज्योत पेटली, असे ते म्हणाले. फुले यांची भाषाशैली प्रभावी आणि विचारप्रवर्तक असून त्यांनी ‘विज्ञानाची काच धरा’ असा दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, त्यांच्या कार्याचे लाभधारक मोठ्या प्रमाणावर स्त्रिया असूनही आज अनेक ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा विसर पडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
एकूणच या परिसंवादातून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा परस्पर संबंध, त्यांची सामाजिक समतेसाठीची लढाई आणि आजच्या काळातील त्यांची उपयुक्तता यावर सखोल चर्चा झाली.
















































