पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार? काय नवी घोषणा करणार?

0
1

दि.१८(पीसीबी)-देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना संदर्भातील 131 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाआज रात्री 8.30 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या या भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

लोकसभेत या विधेयकावर झालेल्या मतदानात एकूण 528 खासदार सहभागी झाले. त्यापैकी 298 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं, तर 230 खासदारांनी विरोधात मत दिलं. मात्र, घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेलं दोन तृतीयांश बहुमत सरकारला मिळवता आलं नाही. आवश्यक असलेल्या मतांपेक्षा 54 मतांनी सरकार कमी पडलं आणि त्यामुळे हे महत्त्वाचं विधेयक फेटाळलं गेलं.

या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांवर जोरदार टीका करताना मोदींनी महिला आरक्षण विधेयक रोखणं म्हणजे महिलांच्या हक्कांवर घाला असल्याचं म्हटलं. विरोधकांची महिलांप्रती भूमिका नकारात्मक असल्याचा आरोपही त्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांनी या विधेयकावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकार मतदारसंघ पुनर्रचनेचा राजकीय डाव आखत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका विरोधकांनी घेतली होती.

या सर्व घडामोडींनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना नेमकी कोणती भूमिका मांडतात, विरोधकांवर काय टीका करतात आणि पुढील रणनीती काय असेल, याकडे देशवासियांचं लक्ष लागलं आहे. देशाच्या राजकारणातील पुढील दिशा ठरवणारे हे भाषण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.