अमेरिका-इराण तणाव कमी होणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे संकेत!

0
3


दि.१५(पीसीबी)-आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेची शक्यता निर्माण झाली आहे.पहिल्या फेरीतील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात होती. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणाव आणि अमेरिकेच्या नाकेबंदीच्या निर्णयामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे संकेत दिले आहेत. अमेरिकन वृत्तपत्र New York Post च्या रिपोर्टनुसार, पुढील दोन दिवसांत पाकिस्तान येथे अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते.

ट्रम्प यांनी या संदर्भात पाकिस्तानच्या भूमिकेचे कौतुक केले असून, तेथील लष्करप्रमुख असीम मुनीर यांचाही उल्लेख केला आहे. “चर्चा अशाच देशात व्हायला हवी ज्याचा या विषयाशी संबंध आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.दरम्यान, या चर्चेसंदर्भात ट्रम्प यांनी एका पत्रकाराशी दोन वेळा थेट संवाद साधल्याचेही समोर आले आहे. “पुढील दोन दिवसांत मोठी घडामोड होऊ शकते,” असा इशाराही त्यांनी दिला.

याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुमारे 40 मिनिटे फोनवर चर्चा केली. या चर्चेत भारत-अमेरिका संबंधांसह इराणमधील परिस्थितीवरही सविस्तर चर्चा झाली.गेल्या महिन्यातील अपयशी चर्चेनंतर ही दुसरी मोठी राजनैतिक हालचाल मानली जात आहे. त्यामुळे अमेरिका-इराण तणाव कमी होणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.