तरुण स्वतःचेच रक्त शरीरात टोचून घेत आहेत; या जीवघेण्या प्रयोगामुळे आरोग्य यंत्रणा हादरली

0
1

दि.१७(पीसीबी) – मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून नशेच्या एका अत्यंत विचित्र आणि भयंकर प्रकाराची माहिती समोर आली आहे. इथले तरुण नशेची ‘किक’ मिळवण्यासाठी चक्क स्वतःचेच रक्त इंजेक्शनद्वारे पुन्हा शरीरात टोचून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जीवघेण्या प्रयोगामुळे आरोग्य यंत्रणा हादरली असून डॉक्टरांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
नेमका प्रकार काय आहे?

भोपाळमधील काही तरुण ड्रग्ज किंवा इतर अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असताना किंवा केवळ नशेची तीव्रता वाढवण्यासाठी हा मार्ग अवलंबत आहेत. यामध्ये तरुण आपले रक्त काढून घेतात आणि काही वेळाने तेच रक्त पुन्हा शिरेद्वारे शरीरात टोचतात. याला स्थानिक भाषेत ‘ब्लड किक’ असे म्हटले जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा प्रकार केवळ नशा नसून थेट मृत्यूला आमंत्रण देणारा आहे. या प्रक्रियेमुळे खालील गंभीर धोके उद्भवू शकतात.

अशुद्ध सुया किंवा चुकीच्या पद्धतीने रक्त टोचल्यामुळे रक्तामध्ये भीषण संसर्ग होऊ शकतो. तसेच शरीराबाहेर आलेले रक्त जर गोठले आणि तेच पुन्हा टोचले गेले, तर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका किंवा ‘स्ट्रोक’ येऊ शकतो. या प्रकारामुळे किडनी आणि यकृतावर गंभीर परिणाम होऊन ते निकामी होण्याची शक्यता असते. सुयांच्या सामायिक वापरामुळे एड्स किंवा हिपॅटायटीस सारख्या गंभीर आजारांचा प्रसार होऊ शकतो.

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, हा प्रकार तीव्र मानसिक विकृती आणि नशेच्या आहारी गेल्याचे लक्षण आहे. तरुण मुले केवळ थरार किंवा काहीतरी वेगळे करण्याच्या नादात आपल्या आयुष्याशी खेळत आहेत. अशा मुलांना तातडीने समुपदेशन आणि व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.