करमाळा (सोलापूर): माणुसकी नेमकी कुठे चालली आहे? असा थरकाप उडवणारा प्रश्न सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील विहाळ गावात निर्माण झाला आहे. ज्या नातीने आजीची सेवा करायला हवी होती, त्याच नातीने केवळ ‘किरकिर’ करते म्हणून आपल्या ८२ वर्षांच्या असहाय्य आजीचा जीव घेतला.
मृत जनाबाई भगवान सुरवसे (वय ८२) या गेल्या अनेक दिवसांपासून अर्धांगवायूने त्रस्त होत्या. शरीर साथ देत नसल्याने त्या अगतिक होत्या. मात्र, त्यांची ही अगतिकता नात मनिषा रविंद्र लवंगारे (वय ३६) हिच्यासाठी केवळ ‘कटकट’ ठरली. रात्रीच्या अंधारात जेव्हा जग शांत होते, तेव्हा या नराधम नातीने आपल्याच रक्ताच्या नात्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. केवळ मारहाण करून या नराधम नातीचे मन भरले नाही, तर तिने क्रौर्याची सीमा ओलांडली. ८२ वर्षांच्या वृद्ध आजीचे डोके जोराने भिंतीवर आपटले. अर्धांगवायूमुळे प्रतिकार करण्याची शक्ती नसलेल्या त्या माऊलीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. स्वतःच्या हाताने स्वतःचा वंश वाढवणाऱ्या आजीला अशा पद्धतीने मारताना या नातीचे हात एकदाही थरथरले नाहीत, हे समाजाचे मोठे नैतिक अध:पतन आहे.
‘पुरावा’ नष्ट करण्यासाठी सुरुवातीला हा नैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यू असल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने आणि उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांच्या पथकाला संशय आला. वैद्यकीय अहवालात जेव्हा आजीच्या शरीरावरील जखमांचे भीषण वास्तव समोर आले, तेव्हा पोलिसांच्या सखोल चौकशीसमोर या ‘कसाई’ नातीने आपला गुन्हा कबूल केला.
















































