दि. १७(पीसीबी)- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन अशोक खरातचे निकटवर्तीय आणि शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके आणि त्यांचा पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच, कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. खासगी आराम बस आणि कार एकमेकांवर आदळल्याने लागलेल्या आगीत सहा प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. यादगीर जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यातील शांतगिरी क्रॉस येथे हा अपघात घडला. या घटनेनंतर स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
खासगी आरामदायी बस बंगळुरुहून कलबुर्गीला निघाली होती, तर कार विरुद्ध दिशेने येत होती. भरधाव कार खासगी आराम बसला येऊन धडकली असता बसने लगेच पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत बसने पेट घेतल्यानंतर बसमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी हाताला मिळेल ते आपले सामान घेऊन बसमधून बाहेर पडण्याची धडपड केली. मात्र, बसमधील सहा प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. तर, इतर प्रवाशांना आपला जीव वाचविण्यात यश मिळाले. या दुर्घटनेत अनेक प्रवासी देखील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे.
बस आणि कार यांच्यातील अपघात आणि आगीचे वृत्त कळताच अग्निशमक दल पाण्याच्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. पण, तोपर्यंत बस आगीत जळून खास झाली होती. अपघातात होरपळून मृत्यूमुखी पडलेले सहा जण एकाच कुटुंबातील असून ते देव दर्शनावरून परत येत होते. कार ओव्हरटेक करताना हा अपघात घडल्याचे यादगीर एस.पी. पृथ्वीक शंकर यांनी सांगितले.













































