शहरात 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान विशेष स्वच्छता मोहिम

0
307

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 12 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध ठिकाणी “प्लॉगेथॉन मोहिम” (विशेष स्वच्छता मोहिम) राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संस्था आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.

आपल्या देशाप्रती असलेला सेवाभाव, स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेले क्रांतीकारक, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन आणि स्वातंत्र्याचा जागर करण्यासाठी केंद्रसरकार आणि राज्यशासनाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमासह रक्तदान शिबीर, व्याख्यानमाला, ग्रंथोत्सव, प्रभातफेरी, प्लॉगेथॉन मोहिम आदी उपक्रमांचा समावेश आहे.

शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी 12 ऑगस्ट 2022 रोजी अ आणि फ क्षेत्रीय कार्यालय, 13 ऑगस्ट 2022 रोजी ब आणि ग क्षेत्रीय कार्यालय, 14 ऑगस्ट 2022 रोजी ड आणि इ क्षेत्रीय कार्यालय तर 15 ऑगस्ट 2022 रोजी क आणि ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून ‘एकदाच वापरासाठी असलेल्या प्लास्टिक विरोधी जनजागृती मोहिम’ राबविण्यात येणार आहे. नागरिकांना प्लास्टिक मुक्तीची शपथ देण्यात येणार आहे. तसेच, कापडी पिशवी वापराबाबत फळ, भाजी विक्रेते, टपरी, हातगाड्यावरील विक्रेत्यांमध्ये जनजागृती, ‘कापडी पिशवी सोबत सेल्फी’ मोहिम राबविण्यात येणार आहे.

नागरिकांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, घरोघरी तिरंगा, स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती बाबत जनजागृती करण्यासाठी डिजिटल चित्ररथाचा वापर करण्यात येणार असून शाळा कॉलेजचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था, बचत गट, गणेश मंडळे, क्लब, गृहनिर्माण संस्था, नागरिक आणि इतर संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करावा, असेही आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी सांगितले