ऐश्वर्यम चॅलेंजर्स, नायर ईगल्स् संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!
दि.२२(पीसीबी)- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पहिल्या ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ (पीसीपीएल) महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत ऐश्वर्यम चॅलेंजर्स आणि नायर ईगल्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.
हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सहेज कौर हिने केलेल्या नाबाद ५१ धावांच्या मदतीने ऐश्वर्यम चॅलेंजर्स संघाने बन्ट् वॉरीयर्सचा ७ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणाऱ्या बन्ट् वॉरीयर्सने २० षटकात १३७ धावा धावफलकावर लावल्या. ऋतुजा गिलबिले (३७ धावा) आणि अर्णवी शिंदे (नाबाद २२ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. हे लक्ष्य ऐश्वर्यम चॅलेंजर्सने १८ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. सहेज कौर हिने ३९ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ५१ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुने नीती अगरवाल हिने ४७ धावा जोडल्या. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ७४ चेंडूत ९९ धावांची भागिदारी रचून संघाचा विजय निश्चित केला.
दुसऱ्या सामन्यात इशा घुले हिने केलेल्या ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर नायर ईगल्स् संघाने ऑक्सिरीच संघाचा १९ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन आमदार उमाताई गिरीष खापरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे, सदस्य हर्ष नायर, मुकेश गुजराथी, नरेंद्र कदम, प्रदीप वाघ, आनंद नायडू, डॉ. संजीवनी पांडे, पूजा अग्रवाल, रवी शेट्टी, नरेंद्र अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू कोतवाल तर, आभार डॉ. दिलीपसिंग मोहिते यांनी मानले. सुत्रसंचालन प्रदीप वाघ यांनी केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना आ. उमाताई खापरे म्हणाल्या की, महिला खेळाडू निर्माण होण्यासाठी शहर असोसिएशन प्रयत्नशील आहे आणि माझी खात्री आहे की, या स्पर्धेतून अनेक गुणवान खेळाडू उदयास येतील.
सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
बन्ट् वॉरीयर्सः २० षटकात ५ गडी बाद १३७ धावा (ऋतुजा गिलबिले ३७, अर्णवी शिंदे नाबाद २२, जान्हवी पोळ १-७, सहेज कौर १-२१) पराभूत वि. ऐश्वर्यम चॅलेंजर्सः १८ षटकात ३ गडी बाद १३८ धावा (सहेज कौर नाबाद ५१ (३९, ५ चौकार, १ षटकार), नीती अगरवाल ४७ (५५, ४ चौकार), श्रावणी फराटे १-१२); (भागिदारीः तिसऱ्या गड्यासाठी सहेज आणि नीती यांच्यात ९९ (७४); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः सहेज कौर; फायटर ऑफ द मॅचः ऋतुजा गिलबिले;
नायर ईगल्स्ः २० षटकात ४ गडी बाद १५९ धावा (इशा घुले ८७ (४६, १४ चौकार, २ षटकार), सृष्टी सुर्यवंशी ४३ (४४, ४ चौकार), स्वांजली मुळे ३-२१) वि.वि. ऑक्सिरीचः २० षटकात ६ गडी बाद १४० धावा (स्वांजली मुळे ८२ (५८, ९ चौकार, १ षटकार), प्रिया यादव २-२५); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः इशा घुले; फायटर ऑफ द मॅचः स्वांजली मुळे;











































