बागेश्वर बाबा माफी मागा अन्यथा काळं फासू- संभाजी ब्रिगेड

0
2

दि,२५(पीसीबी)-बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. “शिवाजी महाराज युद्धाने थकले होते आणि त्यांनी आपले राज्य समर्थांच्या चरणी अर्पण केले” असे वक्तव्य केल्याने इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.

सतीश काळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी आणि स्वराज्याचे शिल्पकार होते. त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने, धैर्याने आणि रणनितीने अनेक लढाया जिंकून स्वराज्य उभे केले. अशा महान राजाला “थकले होते” असे म्हणणे म्हणजे त्यांच्या पराक्रमाचा अपमान आहे. “हे विधान केवळ चुकीचेच नाही तर इतिहासाचा अपमान करणारे आहे,” असे त्यांनी ठामपणे म्हटले.
यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊंचा उल्लेख करत सांगितले की, शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांचे खरे मार्गदर्शक आणि गुरु म्हणजे राजमाता जिजाऊ होत्या. त्यांनी बालपणापासून शिवरायांमध्ये स्वराज्याची बीजे रोवली. त्यामुळे इतर कोणालाही शिवाजी महाराजांच्या जीवनात गुरुस्थान देणे हा ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास आहे.रामदास ठोसर आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. रामदास ठोसर आणि शिवाजी महाराज यांची प्रत्यक्ष भेट झाली याचे ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. तरीही अशा प्रकारचे दावे करून लोकांची दिशाभूल केली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, इतिहास हा अभ्यासाचा विषय आहे, तो मनमानी पद्धतीने बदलता येत नाही.
संभाजी ब्रिगेडने बागेश्वर बाबांना इशारा देत म्हटले आहे की, अशा प्रकारचे बेजबाबदार आणि दिशाभूल करणारे विधान तात्काळ मागे घ्यावे आणि सार्वजनिकरीत्या माफी मागावी. अन्यथा बागेश्वर बाबाला काळं फासले जाईल. “शिवाजी महाराजांविषयी कोणीही चुकीचे बोलले तर ते सहन केले जाणार नाही,” असा इशाराही सतिश काळे यांनी दिला आहे..