आंदोलन कऱणाऱ्या प्रियंका गांधींना अटक, फरफटत नेले

0
322

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) : कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कॉंग्रेसने महागाई, बेरोजगारीविरोधात आणि ईडीच्या कारवायांविरोधात दिल्लीत मोठे आंदोलन छेडले आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी या मोर्चासाठी काँग्रेसला परवानगी दिलेली नसल्याने परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौकात धरणे धरून बसले आहेत. राहुल गांधी काँग्रेस खासदारांसह संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढत होते. मात्र पोलिसांनी त्यांना विजय चौकातच रोखले आणि त्यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर प्रियंका गांधी यांना अक्षरश:फरफटत पोलिसांनी ताब्यात घेतलं.

“पोलिसी बळाचा वापर करून राजभवनावरील काँग्रेसचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा पाठवल्या आहेत. अनेक कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. महाराष्ट्रातच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

राजधानी दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच मोठे नेते रस्त्यावर उतरणार आहेत. यासाठी पक्षाने द्विस्तरीय रणनीती तयार केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. यामुळे मुख्यालयाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच आपल्या मुख्यालयापुढे ठिय्या मांडला आहे. या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणा सुरू आहे. राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा व यूपीमधील कार्यकर्ते दिल्लीत पोहोचलेत. वाढती जीएसटी, लष्कराची अग्निपथ योजना, वाढती महागाई, बेरोजगारी, आणि कंत्राटी पद्धतीच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेला सत्याग्रह जोपर्यंत सरकार कोणताही दिलासा देत नाही, तोपर्यंत सत्याग्रह सुरूच ठेवणार असल्याचे काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी म्हटले आहे. आज काँग्रेस देशभरात आंदोलन करीत आहेत.

दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचाही घेराव काँग्रेस करणार आहे . आदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर वगळता नवी दिल्लीच्या संपूर्ण भागात कलम 144 लागू आहे. निषेधाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली वाहतूक पोलिसांनी लोकांना नवी दिल्लीतील अनेक मार्ग टाळण्याचा सल्ला दिला आहे.