वारकरी सांप्रदायात मनुवाद्यांची घुसखोरी चिंतेची बाब – भारत महाराज जाधव

0
2

संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशिक्षण शिबिर संपन्न
पिंपरी,दि. २२(पीसीबी)-पिंपरी चिंचवड शहरातील वारकरी सांप्रदायातील उल्लेखनीय नाव स्व: नरेंद्रसिहं सोखी गुरुजी यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त किवळे येथे वारकरी प्रबोधन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते. वर्तमानामध्ये वारकरी परंपरेला लागलेली राजकीय कीड आणि त्याचा भागवत धर्मावर होणारा परिणाम लक्षात घेता संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष निरंजन सोखी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिदिना निमित्त एक स्तुत्य उपक्रम आयोजित केला होता. यामुळे खरा वारकरी धर्म समाजाला कळावा हाच एकमेव उद्देश ठेऊन या वारकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सोखी यांनी केले होते. शिबिराची सुरुवात पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंढरपूर येथील कैकाडी मठाचे सर्वेसर्वा ह.भ.प.भारत महाराज जाधव उपस्थित होते त्यांनी वारकरी सांप्रदाया बद्दल आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की वारकरी सांप्रदाय हा ना पुरोगामी आहे ना प्रतिगामी तो नामदेव ज्ञानोबा तुकोबा यांच्या समाज सुधारणेचा जागर आहे संतांनी समाजाला नेहमीच समतेचा संदेश दिला त्यात कुठलीही अंधश्रद्धा नाही आणि कर्मकांड सुद्धा नाही असा संदेश घेऊन जाणारा वारकरी संप्रदाय महाराजांनी मांडला तसेच वारकरी सांप्रदायात मनुवाद्यांनी केलेली घुसखोरी याबद्दल चिंता व्यक्त केली.

या शिबिरास दुसरे मार्गदर्शक म्हणून लाभलेले ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी तथागत गौतम बुद्ध ते संत तुकाराम असा वारकरी परंपरेचा प्रवास वारकऱ्यांसमोर मांडला बंडगर महाराजांनी संत परंपरेतील सुमारे हजारो वर्षाचा समतेचा प्रवास उलगडून तो सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आपल्या प्रवचनरुपी वाणीतून यावेळी केला. आपल्या सर्वच संताचा प्रवास हा भक्ती मार्गाने ज्ञानरुपी समतेकडे जाणारा आहे असा विचार महाराजांनी आपल्या वाणीतून मांडला.

या प्रशिक्षण शिबिरास आवर्जून उपस्थित असलेले माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनीही वारकरी संप्रदायात होणारी सनातन्यांची घुसखोरी थांबवण्याचे गरज आहे अशा भावना व्यक्त केल्या आणि सर्वच वारकऱ्यांना आपल्या संतांचा मौल्यवान विचार पूढे घेऊन जाण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला.यावेळी या शिबिरास संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रमुख मानव कांबळे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो वारकऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिबिराचे सूत्रसंचालन प्रवीण कदम यांनी केले आभार शाहूराज कदेरे यांनी मानले.