महापालिकेतर्फे भव्य रक्तदान शिबिर

0
308

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनासह महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 8 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त केंद्र सरकार व राज्यशासनाच्या निर्देशानुसार शहरात “घरोघरी तिरंगा” (हर घर तिरंगा) या उपक्रमासह विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने शहरात 8 ऑगस्ट 2022 रोजी ‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ या क्षेत्रीय कार्यालयात, 10 ऑगस्ट रोजी ‘ड’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात, 12 ऑगस्ट रोजी ‘फ’,’ग’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात तर 15 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

13 ते 15 ऑगस्ट 2022 कालावधीत महापालिका क्षेत्रामधील प्रत्येक घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, अशासकीय (खाजगी) आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यासाठी महापालिकेच्या अ,ब,क,ड,ई,फ,ग,ह या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये “भारतीय राष्ट्र ध्वज विक्री केंद्र” उभारण्यात आले असून नागरिकांनी ध्वज खरेदीसाठी ध्वज विक्री केंद्रावर गर्दी केली आहे. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या राष्ट्रध्वज हा सिल्क कापडापासून तयार आला असून ध्वजाची किंमत नाममात्र आहे. तसेच 20 जुलै 2022 नंतर ज्या मिळकतधारकांनी कर भरणा केली आहे. त्यांना महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय ध्वज भेट देण्यात येत आहे.