महिला आरक्षण आंदोलनात गोंधळ; मोर्चामुळे वाहतूक कोंडी, संतप्त महिलेचा गिरीश महाजनांना जाब

0
2

दि.२२(पीसीबी)-महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षांकडून देशभरात आंदोलन करण्यात येत असून, मुंबईतही याचे पडसाद उमटले. भारतीय जनता पक्षाकडून काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चादरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला.वरळी येथील जांबोरी मैदानातून सुरू झालेला हा मोर्चा एनएससीआय मैदानापर्यंत काढण्यात आला. मात्र, या मोर्चामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

याच दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना थेट जाब विचारला. “तुमचं हे काय चाललंय? इथून निघून जा… शेकडो लोक तुमच्या मोर्चामुळे अडकले आहेत. आंदोलन करायचं असेल तर मैदानात करा, रस्त्यावर का?”, अशा शब्दांत महिलेने आपला रोष व्यक्त केला.

महिलेने उपस्थित पोलिसांनाही सवाल करत, “इतकी मोठी वाहतूक कोंडी होत असताना तुम्ही काहीच का करत नाही?”, असा प्रश्न उपस्थित केला. या घटनेचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.दरम्यान, या घटनेमुळे आंदोलनाच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सार्वजनिक गैरसोयीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.