मुंबई-पुणे, कोकण मार्गावरील प्रवास सुसाट ; ‘या’ एक्स्प्रेस १३० किमी वेगाने  धावणार   

0
558

मुंबई, दि. २ (पीसीबी) –  मध्य रेल्वेने  मुंबई-पुणे आणि मुंबई-मडगाव या मार्गावरील प्रवास सुपरफास्ट होण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना सुखकर आणि जलद प्रवास करता येणार आहे.  मुंबई-पुणे  मार्गावरील डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी तसेच मुंबई-मडगाव मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला एलएचबी (लिकें हाँफमन बुश) डबे जोडण्यात येणार आहेत. यामुळे या एक्स्प्रेस ताशी १३० किमी वेगाने धावणार आहेत. 

प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास घडविण्यासाठी ‘एलएचबी’ तंत्रज्ञानाचे हायफाय डबे जोडण्यात येणार आहेत. जर्मन तंत्रज्ञानाचे  या  प्रकारचे आधुनिक डबे पंचवटी एक्प्रेससह मध्य रेल्वेच्या २४ गाडय़ांना  जोडण्यात आले आहेत. ट्रेन क्र. १०१११/२ सीएसएमटी ते मडगाव कोकणकन्या एक्प्रेस आणि ट्रेन क्र. १०१०३/४  सीएसएमटी ते मडगाव मांडवी एक्प्रेसला १० जून ते ३१ ऑगस्टदरम्यान एलएचबीचे २२ डबे  जोण्यात येणार आहेत.

याची संरचना प्रथम, द्वितीय श्रेणी एक एसी डबा, द्वितीय श्रेणीचा एक डबा, तृतीय श्रेणीचे ४ एसी डबे, ११ स्लीपर क्लास, २ सामान्य डबे आणि एक पँट्री डबा अशी असेल. तर, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी एक्स्प्रेसच्या डब्यांच्या जागी अपघातरोधक डबे (एलएचबी) बसविण्याला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे.  एलएचबी डब्यांमुळे या दोन्ही एक्स्प्रेस ताशी १३० किमी वेगाना धावणार आहेत. ६ ते ८ महिन्याच्या आत दोन्ही एक्स्प्रेस एलएचबी डबे जोडण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे  अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या डब्यांमध्ये जास्त जागा आहे. तसेच बेसिन, टॉयलेट यांच्या रचनेत  बदल केले आहेत.  यासह दरवाजातील अरूंद जागा वाढवण्यात आली आहे.  त्यामुळे  डब्यांमध्ये  चढताना तसेच उतरताना  प्रवाशांना धक्काबुकी, गर्दीच्या त्रासापासून सुटका होणार आहे. त्याचबरोबर या डब्यांची लांबी आणि रुंदी  वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा  प्रवास अधिक  आरामदायी व सुखकर होण्यास मदत होणार आहे.

रेल्वेने   ‘आयसीएफ’ कोचची निर्मिती   पूर्णपणे बंद केली  असून आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे लिंफे-हॉफ मॅन- बुश (एलएचबी) कोच  घेण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे.  या डब्यांचे वजन  जुन्या  डब्यांपेक्षा हलके आहे. यामुळे अपघातामध्ये   जीवितहानी टाळली जाते.  तसेच उच्च तंत्रज्ञानामुळे अपघातात हे डबे एकमेकांवर आपटत नाहीत. तसेच  डब्यांवर डबे चढत नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.