गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवला भूसुरुंग स्फोट; १५ जवान शहीद

0
428

गडचिरोली, दि. २ (पीसीबी) – राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडाजवळ बुधवारी (दि.१) भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात शीघ्रकृती पथकाचे (क्यूआरटी) १५ जवान शहीद झाले. जवानांना घेऊन जाणाऱ्या खासगी गाडीचा चालकही या हल्ल्यात मृत्युमुखी पडला.

पोलीस शिपाई साहुदास बाजीराव मडावी, प्रमोद महादेव भोयर, राजू नारायण गायकवाड, किशोर यशवंत बोबाटे, संतोष देविदास चव्हाण, सर्जेराव एकनाथ खर्डे, दयानंद ताम्रध्वज शहारे, भूपेश पांडुरंग वालोदे, आरिफ तौशिब शेख, योगाजी सीताराम हलामी, पुरणशहा प्रतापशाह दुगा, लक्ष्मण केशव कोडापे, अमृत प्रभुदास भदाडे, अग्रमान बक्षी रहाटे, नितीन तिलकचंद घोडमोरे या १५ हे जवान शहीद झाले. तर दादुभाऊ सिंगनाथ असे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

नक्षलवाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या ३६ वाहनांची जाळपोळ केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर सकाळी ११ वाजता कुरखेडा येथून शीघ्रकृती पथक घटनास्थळाच्या दिशेने निघाले असता जांभुळखेडा-लेंडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात हे जवान शहीद झाले.