संजोग वाघेरे चक्क खाली वाकून अजितदादांच्या पाया पडल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत संदेश पोहचला…

0
601

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात वेगळीच चर्चा रंगली आहे. अजित पवार हे महायुती सोबत असून श्रीरंग बारणे हे महायुतीचे उमेदवार आहेत. बारणे यांनी २०१९ ला झालेल्या निवडणुकीत पार्थ पवार यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. हाच पराभव अजित पवारांसह पार्थ पवारांच्या जिव्हारी लागला होता. संजोग वाघेरे यांनी लग्नाच्या व्यासपीठावर अजित पवारांचा आशीर्वाद घेतल्याने संजोग वाघेरे यांना छुपा पाठिंबा नाही ना ? अशी शहरात चर्चा रंगली आहे. दरम्यान, वाघेरे यांना खुद्द अजित पवार यांनीच शिवसेनेत पाठवून आपले चिरंजीव पार्थ पवार यांच्या २०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्याची खेळी केल्याचे राष्ट्रवादी आणि भाजपचे पदाधिकारी खासगीत सांगत आहेत.

पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी शुक्रवारी संध्याकाळी गाठी- भेटीचा कार्यक्रम होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहकाही दिवसांपूर्वी अजित पवार हे महायुतीच्या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीत बारणेंना प्रचंड मतांनी विजयी करा अस कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आवाहन केलं होतं. त्याच बैठकीत बारणेंनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत अप्रत्यक्षरीत्या पार्थ पवारांच्या पराभवाचा उल्लेख केला होता. अस असलं तरी पार्थ पवारांचा पराभव हा राष्ट्रवादी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या जिव्हारी लागला होता. ते तो पराभव विसरू शकले नाहीत. तेच अजित पवार बारणेंच्या समर्थनार्थ प्रचार करत आहेत. परंतु, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी अजित पवारांचे आशीर्वाद घेतल्याने मावळ लोकसभा आणि पिंपरी- चिंचवड शहरात वाघेरे यांना अजित पवारांचा पाठिंबा आहे का? अशी चर्चा रंगली आहे.

लग्न सोहळ्याला इतर नेते ही कार्यक्रमाला हजर होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर आले. संजोग वाघेरे यांनी अजित पवारांना वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतले. यामुळे मावळ लोकसभेत वेगळीच चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले संजोग वाघेरे हे शिवबंधनात अडकले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मावळ लोकसभेची उमेदवारी मिळाली, तर महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी रात्री संजोग वाघेरे आणि दिवसा श्रीरंग बारणे असा प्रचार करत असल्याचे चित्र आहे. खासदार बारणे यांच्या पदयात्रा, प्रचारसभांनाही राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकार्यांची उपस्थिती अत्यल्प असते. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीत खासदार बारणे सद्या एकाकी पडल्याचे चित्र आहे. भाजपचे सर्व पदाधिकारी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मागे असल्याने आणि भाजपला संधी न मिळाल्याने जी नाराजी होती ती अद्याप कायम आहे.