MDH आणि EVEREST च्या मसाल्यांत कर्करोगास कारणीभूत घटक

0
54
  • हाँगकाँग आणि सिंगापूरने विक्रीस लावले निर्बंध

हाँगकाँग आणि सिंगापूरमधील अन्न नियामकांनी दोन लोकप्रिय भारतीय मसाल्यांच्या विशिष्ट उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक आढळल्याने विक्रीस तात्पुरते निर्बंध लावले आहेत. यानंतर आता MDH आणि एव्हरेस्ट या दोन ब्रॅण्ड्सच्याबाबत भारतीय केंद्र सरकारने सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या व वृत्तानुसार, सरकारने अन्न आयुक्तांना देशातील सर्व उत्पादन युनिट्समधून मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मसाल्यांचे नमुने गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तीन ते चार दिवसांत देशातील सर्व मसाल्यांच्या उत्पादन युनिटमधून नमुने गोळा केले जातील आणि मग २० दिवसात या मसाल्याच्याबाबत अहवाल सादर केला जाईल.

हाँगकाँग आणि सिंगापूर अन्न नियामकांनी एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन मसाल्यांच्या ब्रँडमधील चार उत्पादनांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात इथिलीन ऑक्साईड वापरले गेल्याचे म्हटले होते. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलीन ऑक्साईडला ‘ग्रुप 1 कार्सिनोजेन’ म्हणून वर्गीकृत केले आहे.

Hong Kong’s Center for Food Safety (CFS) ने ५ एप्रिलला सांगितले की, MDH च्या तीन मसाल्यांच्या उत्पादनांमध्ये – मद्रास करी पावडर, सांबार मसाला, करी पावडर यांचा समावेश आहे तर, एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यामध्ये हे इथिलीन ऑक्साईड आढळले होते. तर सिंगापूर फूड एजन्सी (SFA) ने देखील एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यात अधिक प्रमाणात इथिलीन ऑक्साईड असल्याने हे मसाले बाजारातून परत मागवण्याचे आदेश १८ एप्रिलला दिले होते. एमडीएच आणि एव्हरेस्ट फूड्स या दोन्ही कंपन्यांनी अद्याप या दाव्यांवर भाष्य केलेले नाही.

केंद्र सरकारने काय भूमिका घेतली?
प्राप्त माहितीनुसार, भारतात खाद्यपदार्थांमध्ये इथिलीन ऑक्साईड वापरण्यास बंदी आहे. भारतीय मसाल्यांमध्ये हानिकारक पदार्थ आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. यासाठी उत्पादकांवर फौजदारी कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. या प्रकरणानंतर सध्या केंद्र सरकारने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील मसाले मंडळाला आवाहन करून उत्पादनांमध्ये कोणतेही हानिकारक घटक जोडले जाऊ नयेत यासाठी जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.

मसाला मंडळाचं उत्तर काय?
स्पाईसेस बोर्ड ऑफ इंडियाचे संचालक एबी रेमा श्री यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध ब्रँडच्या मसाल्यांमध्ये आतापर्यंत कोणतेही हानिकारक घटक आढळले नाहीत. मसाल्याचे नमुने तपासणे ही एक सततची प्रक्रिया आहे. पण यापूर्वी आम्ही जे काही नमुने घेत होतो त्यापेक्षा या वेळी अधिक वेगाने आणि मोठ्या संख्येने नमुने घेऊ.