अजूनही ‘नेहरू वाईट, काँग्रेस वाईट’चे गुऱ्हाळ….

0
46

एवढा बोगस प्रचार कधीच पाहिला नाही सत्ताधारी पक्षाकडून. अमित शहा म्हणतात शरद पवार कृषिमंत्री होते तेव्हा काय केलं? मोदी म्हणतात सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं? पण लोकांनी यांना दिलेल्या दहा वर्षात यांनी काय केलं हे दोघंही सांगत नाहीत. अजूनही ‘नेहरू वाईट, काँग्रेस वाईट’ हेच यांचं सगळं भांडवल आहे. आर्थिक योजना काय हेही आता बोलत नाहीत.

स्वच्छ भारत, नमामि गंगे, मेक इन इंडिया, अग्निवीर, जनधन अकाऊंट या संपूर्ण फसलेल्या स्वतःच्या योजनांवर एक शब्द बोलत नाहीत.

काय बोलणार? फक्त राडे करून ठेवले दहा वर्षात! दाखवण्यासारखं काय आहेच काय? फक्त देशाला ओरबाडून खाल्लं आणि ते चारचौघात सांगता येत नाही.

नोटबंदीचं वीस टक्के कमिशन कोणी खाल्लं? पीएम केअर फंड हा माहिती अधिकारात न येऊ देता आपल्या सार्वजनिक कंपन्यांकडून ३००० कोटी कोणी लाटले? इलेक्टोरल बाॅन्डमधून हजारो कोटी कोणी खाल्ले? या घोटाळ्यांबाबत ते काय बोलणार? कुठेच नसलेला अदानी जगातल्या पाच श्रीमंतांमध्ये कसा यावर काय बोलणार?

क्रूड तेलाच्या किंमती कमी होत असतानाही पेट्रोल ६६ रुपयांवरून १०७ रुपयांवर कसं गेलं? ४१० रूपयांचा गॅस ११०० रूपयांवर कोणी नेला? सर्वत्र वाढलेली महागाई, यावर काय बोलणार?

शेतकरी तर पुरता खचवला. एकट्या महाराष्ट्रात दोन महिन्यांत ४५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या यावर हे शिंदे-फडणवीस-दादा गप्प का आहेत? काहीच का बोलत नाहीत? सोयाबीनचा भाव ४२०० आहे जो मोदींनी शपथ घेतांना २०१४ साली होता. दहा वर्षात खतं, औषधं, बियाणं यांच्या किंमती कुठल्याकुठे वाढल्या आणि उत्पन्न मात्र तितकंच राहीलं यावर बोलण्याची हिंमत नाही भ्रजपाच्या कोणत्याच नेत्याची.

आम्ही काॅर्पोरेट कंपन्यांना १४,००,००० कोटींची कर्जमाफी दिली पण शेतकर्‍याचं एक रुपयाचं कर्जही माफ केलं नाही हे संसदेत सांगणारं सरकार आता कोणत्या तोंडानं शेतकऱ्याला सामोरं जाणार?

परवा एका शेतकर्‍याची क्लिप व्हायरल झाली. त्यात तो म्हणतो की प्रत्येक शेतकरी किमान १ लाखाचं खत दरवर्षी विकत घेतो. मोदींनी त्याच्यावर १८ टक्के जीएसटी लावून माझे १८,००० घेतले. (मनमोहनसिंगांनी जीएसटी लावला नव्हता) आणि उदार होऊन माझ्या खात्यात याच पैशातून ६,००० टाकले म्हणजे मोदींनी माझेच वर्षाला १२,००० खाल्ले त्याचा हिशेब कधी करायचा? शेतकरी हातात आसूड घेऊन उभा आहे आता.

२०१९ ला पुलवामा केलं. त्याची पोलखोल सत्यपाल मालिकांनी करून वाट लावली. यावेळी तोही हातखंडा चालणार नाही कारण राष्ट्रवादाचा स्वार्थी वापर लोकांच्या लक्षात आला आहे आणि या प्रकरणानंतर विश्वासार्हताच संपलेली आहे. खरोखरच पाकिस्तान भारत युद्ध सुरू झालं तरी आता लोक म्हणणार हे निवडणुकीसाठी आहे! विश्वासार्हता एवढी संपली आहे की ‘मित्रो आज अप्रैल की २७ तारीख है’ असं म्हणाले तरी लोक एकदा कॅलेंडर बघून घेतात.

सर्व पातळ्यांवर आलेलं अपयश, संपलेली विश्वासार्हता आणि हुकूमशाहीवर लोक जागोजागी व्यक्त करत असलेला राग यामुळे आता प्रचारात फक्त चिडचीड, तेच ते सत्तर वर्षाच्या नावे नेहरू आणि काँग्रेसवर खडे फोडणं, तीच जुनी हिंदू-मुस्लिम भांडणं लावायची चाल आणि मंगळसूत्र वगैरे संबंध नसलेले विषय घेऊन प्रचार करावा लागत आहे.

एवढा विषारी आणि असहाय्य झाल्यासारखा सरकारी पक्षाचा निवडणूक प्रचार या देशानं पूर्वी कधीही पाहिला नव्हता.