कॅलिफोर्नियाच्या एसएइ एरो डिझाईन वेस्ट स्पर्धेत पीसीसीओईचे नेत्रदीपक यश

0
44

पिंपरी, दि. २७ – कॅलिफोर्निया, यूएसए येथे सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (SAE) इंटरनॅशनल द्वारे आयोजित करण्यात आलेल्या एसएई एरो डिझाईन वेस्ट स्पर्धेत पीसीसीओईच्या “टीम मावेरिक इंडिया” या संघाने नेत्रदीपक यश मिळवले. ७५ देशातील विविध संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत “टीम मावेरिक इंडिया” संघाने विविध गटात उल्लेखनीय यश मिळवून एकूण स्पर्धेत जागतिक पातळीवर दहावा क्रमांक पटकावला आणि नेत्रदीपक यश मिळवले. या यशामुळे जागतिक पातळीवर भारतीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च तांत्रिक क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रेडिओ-नियंत्रित विमानाच्या डिझाइन, अभियांत्रिकी आणि उड्डाण क्षमतांचे मूल्यांकन उल्लेखनीय होते. या स्पर्धेत जगभरातील संघ नाविन्यपूर्णता, तांत्रिक कौशल्ये आणि टीमवर्कचे प्रदर्शन करतात.
पीसीसीओई टीमचे नेतृत्व रिफा अन्सारी हिने केले. यामध्ये पार्थ देशमुख, मिहीर रमेश झांबरे, अनिकेत पिंगळे, अपूर्वा परदेशी, तन्मय राजपूत, ओम दुर्गे, प्रणाली मगदूम, आयुष बोडखे, सर्वेश पाटील, अनिरुद्ध पाटील, मृणाल सागरे, तृप्ती बावनकर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. पी. ए. देशमुख, प्रा. डॉ. नरेंद्र आर. देवरे, प्रा. चंदन इंगोले यांनी मार्गदर्शन केले.
पीसीसीओईच्या मोटरस्पोर्ट्स संघाचे हे यश विद्यार्थ्यांमध्ये नावीन्य आणि व्यावहारिक कौशल्ये वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करते. स्पर्धात्मकता आणि उत्कृष्टतेच्या संस्कृतीला चालना देऊन, आंतरराष्ट्रीय स्तरावर तरुण अभियंत्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी पीसीसीओईचे व्यवस्थापन नेहमीच पाठबळ देते असे पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.