मणिपुरचे कुकी- म्यानमार, मणिपूर, मिझोरामच्या वांशिक कुकी-चिन-झो समुदायाचा ख्रिश्चन राष्ट्रवाद! – विनय जोशी

    0
    712

    कुकींचे अन्य जातींसोबत संबंध आणि राज्यातील भाजप सरकार ख्रिश्चन विरोधी हिंसाचार भडकवत आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा धावता प्रयत्न…

    (०२-मणिपुरच्या अशांततेवरील लेखमालेतील दुसरा लेख )

    (ICRR – Assam & North East)

    पहिल्या लेखात आपण मणिपूरच्या वैष्णव हिंदू मैतेई समाजाचा विविध अंगांनी आढावा घेतला, आता मणिपूरचे कुकी नेमके कोण आहेत, त्यांचे मैतेई आणि अन्य जगासोबत कसे संबंध आहेत आणि त्यांची सामाजिक, राजकीय, धार्मिक मानसिकता कशी आहे याची चर्चा करू.

    म्यानमार आणि भारतातील शान, कारेन, चिन, झो आणि कुकी…
    म्यानमार हा बौद्ध बहुल देश आहे. म्यानमारी लोक ज्यांना बामार किंवा बर्मन अथवा बर्मीज म्हणतात त्यांची लोकसंख्या सर्वात जास्त म्हणजे सुमारे ६८% आहे, त्याखालोखाल शान हे पहाडी जनजातीय (ट्रायबल) ९%, कारेन जनजाती ७%, मोन जनजाती २%, काचीन जनजाती १.५% आणि चिन जाती समूह १.५% ज्यात कुकी, चिन, झो (मिझो) आणि अन्य ३२ वांशिक, भाषिक जातींचा समावेश होतो. बाकी अन्य गटांपेक्षा आपल्याला सध्या या चिन जाती समूहाचा आढावा घ्यायचा आहे कारण म्यानमारचा चिन प्रांत हा मणिपूर- मिझोरामला आंतरराष्ट्रीय सीमेने जोडलेला आहे.

    चिन वांशिक- भाषिक समूह..
    चिन जाती समूहात (याचा कम्युनिस्ट चीन देशाशी नाव साधर्म्य वगळता अन्य काहीही भाषिक/ वांशिक संबंध नाही) झोमा, झानियात, यॉ, यिंडू, सेंथान्ग, गॉन, मिझो, झोतुंग, दाई, थडाऊ म्हणजे कुकी, खामी, म्रो- खिमी, मातु, हमार, अशो, चो, मारा इत्यादी प्रमुख जाती येतात. यांची म्यानमार, भारत, बांग्लादेश मिळून लोकसंख्या ४५ लाखांच्या आसपास आहे. यापैकी कुकी आणि मिझो या जातींची संख्या भारतात सर्वाधिक आहे. जरी ते एका जाती समूहात असले तरी आता त्यांच्यात भाषिक साधर्म्य फारच कमी उरलेलं आहे. पण बॅप्टिस्ट आणि प्रेसबिटेरियन चर्चच्या ब्रिटिश समर्थित आक्रमक कारभारामुळे आता ह्या दोन्ही जाती कट्टर ख्रिश्चन म्हणून गणल्या जातात आणि त्यामुळे गैर ख्रिश्चन समूहांसोबत यांचं टोकाचं शत्रुत्व आहे.

    कुकी- मिझो यहुदी उगमाचा सिद्धांत..
    एकीकडे कट्टर ख्रिश्चन असलेले कुकी, मिझो दुसरीकडे स्वतःला आपण यहुदी लोकांच्या १२ हरवलेल्या ट्राईब्ज पैकी दहावी हरवलेली ट्राइब (टेंथ लॉस्ट ट्राईब ) आहोत असं मानतात. २००६-०७ मध्ये जवळपास ३०० कुकी परिवारांनी सगळ्या कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून इस्राएलची नागरिकता मिळवून कायमचं स्थलांतरही केलं आहे. एकाच वेळी कट्टर ख्रिश्चन असणं आणि त्याच वेळी जीझस ख्राईस्टच्या हत्त्येचा आरोप करून देशोधडीला लावलेल्या यहुदी जातीशी वांशिक नातं सांगणं हा एक मोठ्ठा विरोधाभास आहे!

    कुकी-चिन- झो समूह आणि ब्रिटिश राज संबंध:- १९१७-१९ कुकी- ब्रिटिश युद्ध
    कुकी आणि ब्रिटिश यांच्यात सुरुवातीपासूनच सतत संघर्ष होत होते. ब्रिटिश आल्यामुळे “झालेंगाम” म्हणजे कुकी (चिन ) “राष्ट्राचे” अनैसर्गिक दोन भाग झाले अशी कुकींच्या मनात सामूहिक वेदना होती. चिन जातीची मातृभूमी “झालेंगाम” बर्मा आणि भारतात विभागली गेली आणि ती फाळणी ब्रिटिशांमुळे झाली या कारणाने कुकी- चिन – झो यांचे ब्रिटिशांसोबत संबंध बिघडत होते.

    पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीत ब्रिटिशांनी जगभरातून अनेक देशातले तरुण ब्रिटिश आर्मीच्या लेबर कोअर मध्ये युद्धसाहित्याच्या आणि जखमी सैनिकांच्या वाहतुकीसाठी नेले. कुकींच्या नेत्यांनी असा निर्णय घेतला कि ब्रिटिश सैन्याला कुकी तरुणांनी अजिबात सहयोग करू नये. आणि आपल्या “झालेंगाम” म्हणजे राष्ट्रासाठी आता ब्रिटिशांसोबत युद्ध पुकारण्याची गरज आहे. भारत आणि बर्मा मध्ये कुकींनी युद्धाची तयारी करण्यासाठी समुदायात निरोप पाठवले आणि युद्धाची घोषणा झाली. पण हा संदेश लुशाई हिल्स म्हणजे सध्याच्या मिझोराममध्ये पोचण्यापूर्वीच तिथले २१०० लुशाई-झो तरुण ब्रिटिशांनी फ्रांस युद्ध आघाडीवर पाठवून दिले होते.

    २ वर्षाच्या कुकी- ब्रिटिश युद्धात आधुनिक शस्त्रांच्या जोरावर ब्रिटिश जिंकले आणि २५ कुकी नेते पकडले गेले त्यापैकी काहींना इंफाळ जेलमध्ये आणि काहींना बर्मीज जेलमध्ये टाकण्यात आलं. एकूण ४७७ ब्रिटिश सैनिक, अधिकारी या युद्धात मेले. आणि नंतर अजुन ४००० कुकी- चिन तरुण बळजबरीने फ्रांसला युद्धतयारीत पाठवण्यात आले.

    नॉर्थ ईस्ट मध्ये ज्या ज्या जातींनी ब्रिटिशांना पराकोटीचा आणि हिंसक विरोध केला त्या त्या जाती वेगाने आणि जवळपास संपूर्ण ख्रिश्चन झाल्या हे एक चमत्कारिक सत्य आहे, याचं समाजशास्त्रीय कारण शोधण्याची गरज आहे. नागा, मिझो आणि कुकी हि याची सगळ्यात मोठी उदाहरणे आहेत.

    कुकी चिन आणि म्यानमारच्या बौद्धांचे परस्पर संबंध..
    ब्रिटिश राज सुरु असताना ब्रिटिशांनी तत्कालीन बर्माचा (सध्याचा म्यानमार) राज्यकारभार करताना शान, कारेन, राखाईन मोन, काचीन, चिन आदी पहाडी अल्पसंख्य लोकांची मदत घेतली. शिवाय भारतीय सुद्धा त्यावेळी मोठ्या संख्येने बर्मा मध्ये होते त्यामुळे तेही ब्रिटिशांचे सहयोगी झाले. ज्या देशात राज्यकारभार करायचा तिथल्या बहुसंख्य समाज गटाला बाजूला सारून अल्पसंख्य हाताशी धरायचे हि वसाहतवादी पद्धत ब्रिटिशांनी सर्वत्र वापरली तशीच बर्मा मध्ये वापरली. यामुळे बहुसंख्य बौद्ध बर्मीज- बामार लोकांमध्ये या अल्पसंख्य पहाडी आणि भारतीय लोकांबद्दल ब्रिटिशांचे “हस्तक” अशी एक तीव्र घृणा निर्माण झाली. ब्रिटिशांना हाकलण्याच्या कामी तेव्हाचा प्रभावशाली बर्मीज नेता ऑंग सान ( सध्याच्या बर्मीज लोकशाहीवादी नेत्या ऑंग सान सु कि यांचे वडील) यांनी या सर्व वांशिक अल्पसंख्य गटांची चांगली मोट बांधली होती. पण ब्रिटिश गेल्यानंतर आणि ऑंग सान यांच्या हत्त्येनंतर परिस्थिती बदलली आणि भारतीयांसह पहाडी वांशिक अल्पसंख्य लोकांना बौद्ध बर्मीज लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. बहुतांश भारतीय म्यानमार सोडून भारतात आले पण अन्य ख्रिश्चन पहाडी अल्पसंख्य तिथेच आहेत आणि त्यांच्यात आणि म्यानमारच्या सैन्यात गेली कित्येक दशके भीषण गृहयुद्ध सुरु आहे.

    म्यानमारी ख्रिश्चन फुटीरतावादी (अतिरेकी) सशस्त्र गट.
    सध्या म्यानमार मध्ये १७ ख्रिश्चन फुटीरतावादी (अतिरेकी) सशस्त्र गट आहेत, त्यांची नावं आणि सैनिकी क्षमता याप्रमाणे.
    १) युनायटेड वा स्टेट आर्मी- ३०,००० सशस्त्र केडर्स अधिक १०,००० रिझर्व्ह केडर्स (अचानक भरती करता येतील असे प्रशिक्षित तरुण),
    २) काचिन इंडिपेडन्स आर्मी- १०,००० सशस्त्र केडर्स अधिक १०,००० रिझर्व्ह केडर्स,
    ३) रिस्टोरेशन कौन्सिल ऑफ शान स्टेट- ८००० सशस्त्र केडर्स,
    ४) शान स्टेट प्रोग्रेस पार्टी- ८००० सशस्त्र केडर्स,
    ५) कारेन नॅशनल लिबरेशन आर्मी- ५००० सशस्त्र केडर्स,
    ६) ता’आंग नॅशनल लिबरेशन आर्मी- ४५०० सशस्त्र केडर्स,
    ७) नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मी- ईस्टर्न शान स्टेट- ४५०० सशस्त्र केडर्स,
    ८) म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मी- २००० सशस्त्र केडर्स,
    ९) डेमोक्रॅटिक कारेन बेनेवोलॅन्ट आर्मी- १५०० सशस्त्र केडर्स,
    १०) न्यू मोन स्टेट पार्टी- ८०० सशस्त्र केडर्स अधिक २,००० रिझर्व्ह केडर्स,
    ११) कारेनी नॅशनल प्रोग्रेसिव्ह पार्टी- ६०० सशस्त्र केडर्स,

    याशिवाय नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड- खापलांग गट (केडर्स ५००), पा-ओ नॅशनल लिबरेशन ऑर्गनायझेशन (४००), चिन नॅशनल फ्रंट (२००), कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन- बर्मा (२००), कारेन नॅशनल लिबरेशन आर्मी- पीस कौन्सिल (२००), आराकान लिबरेशन पार्टी (१००) हे सशस्त्र गट म्यानमार सरकार विरोधात लढत आहेत आणि यातले काही भारत सरकार विरोधात सुद्धा लढत आहेत.

    या १७ सशस्त्र गटांना म्यानमारी सैन्याने दाब दिला कि ज्यांना शक्य आहे ते अतिरेकी भारतात येतात कारण घनदाट अरण्यामुळे इथे येताना त्यांना थांबवणं शक्य नसतं. भारत सरकार मानवाधिकार, लोकशाही, कायदे वगैरे बाबी मानते आणि भारतीय सेनाही या बाबींना महत्व देते त्या उलट म्यानमारी सेना ख्रिश्चन गावांवर हवाई हल्ले, गावंच्या गावं जाळून खाक करणं, लोकांना एका जागी रांगेत उभं करून गोळ्या घालणं वगैरे प्रकार करते त्यामुळे हे ख्रिश्चन पहाडी अल्पसंख्य आणि सशस्त्र गट सतत भारतात येतात.

    २०२१ च्या म्यानमारी सरकारच्या कारवाईमुळे म्यानमारच्या चिन स्टेटचा मुख्यमंत्री सलाई लिआन लुआई भारतात मिझोराम मध्ये शरणार्थी म्हणून येऊन राहत होता. सध्याच्या मणिपूर मधल्या मैतेई- कुकी संघर्षात म्यानमार मधून पळून येऊन कुकींच्या आश्रयाला राहिलेले म्यानमारी अतिरेकी मोठी भूमिका बजावत आहेत.

    मणिपूरमध्ये अमेरिकन सैन्य आघाडी “नाटो” ची शस्त्रे अशी आली…
    म्यानमार मध्ये जिथे वांशिक अल्पसंख्य ख्रिश्चन राहतात तिथे जमिनीत क्रूड तेल, नैसर्गिक वायू आणि बहुमूल्य खनिज संपत्ती आहे. चिनी कम्युनिस्ट सरकार म्यानमारी सैन्य शासनाला (मिलिटरी जंटअ Military Junta) जागतिक पातळीवर उघड समर्थन देते. याबदल्यात पहाडी भागातील बहुमूल्य तेल आणि नैसर्गिक वायू आणि खनिज संपत्ती कवडीमोलाने लुटायची सूट देते. अशीच एक ९७३ किमी लांबीची क्रूड तेलाची पाईपलाईन म्यानमारच्या राखाईन मधून चीनच्या दक्षिण भागात जाते आणि यावर मंडाले भागात मे २०२३ मध्ये वांशिक सशस्त्र गटांनी बॉम्ब हल्ला केला होता. (ET- Rebels attack China-backed energy project in Myanmar, days after FM visit ) चीनची म्यानमार मधील गुंतवणूक पाण्यात घालवण्यासाठी अमेरिका निर्मित नाटो सैन्य आघाडी म्यानमारी अतिरेकी गटांना शस्त्र पुरवठा करते असा एक आरोप/ सिद्धांत आहे. असाच अजून एक हल्ला जुलैच्या सुरुवातीला चिनी सैनिकी वाहनावर म्यानमारमध्ये झाला (WION- Chinese military convoy attacked by rebels in Myanmar, claims junta ) या हल्ल्यात काचिन इंडिपेडन्स आर्मीचा हात असल्याचा आरोप म्यानमारच्या सैन्याने केला आहे.

    सध्याच्या मणिपूर हिंसाचारात, गळ्यात एक अत्याधुनिक ऑटोमॅटिक रायफल अडकवून मैतेई हिंदूंना धमकी देणाऱ्या कुकी माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियात खूप फिरत होता ती रायफल नाटो सप्लाय मधून आल्याचा निष्कर्ष संबंधित अधिकारी/ विश्लेषक काढत आहेत.

    कुकी- नागा संबंध..
    जसे चिन वांशिक गटाच्या अंतर्गत ३ डझन समाजगट येतात ज्यात कुकी हा एक मोठा गट आहे, तसेच “नागा” नावाची अशी कोणतीही एकसंध ओळख किंवा समाजगट काही वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हता, त्यात समाविष्ट आओ, अंगामी, तांगखुल, झेलीयांग, चाकेसांग, रेंगमा, सुमी, फोम, कोन्याक आणि अन्य अनेक जाती या राजकीय उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी बॅप्टिस्ट चर्च ने एका धाग्यात विणण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही या जाती आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहेत.

    नागांनी केलेलं १९९३ चं कुकी हत्याकांड…
    दोन्ही बाजूला बॅप्टिस्ट ख्रिश्चन असले तरीही नागा आणि कुकी यांच्यात भयंकर शत्रुत्व आहे. मणिपूरच्या तांगखुल नागांची नागा अतिरेकी संघटना एनएससीएन-आय एम आणि कुकी यांचा भौगोलिक संघर्ष जुना असला तरी १३ सप्टेंबर १९९३ च्या “जोउपी हत्याकांडाने” संपूर्ण कुकी समाज आणि नॉर्थ ईस्ट हादरून गेला. नागा अतिरेक्यांनी जोउपी गावावर हल्ला करून ११५ कुकींना गोळ्या घातल्या, त्या पाच वर्षात एकूण ३५० बॅप्टिस्ट कुकी खेडी बॅप्टिस्ट नागा अतिरेक्यांनी जाळून एकूण ११५७ निःशस्त्र बॅप्टिस्ट कुकी क्रूरपणे ठार मारले. ग्रेटर नागालँड किंवा “नागालीम” च्या प्रस्तावित नकाशात येणारी सर्व गावे बॅप्टिस्ट नागांनी “बॅप्टिस्ट कुकी मुक्त” करून टाकली. आज या गावात १९९३ ला मारल्या गेलेल्या कुकींचं तीन उंच दगडांचं स्मारक बांधलेलं आहे आणि दरवर्षी इथे मृतात्म्यांना श्रद्धांजली द्यायला हजारो कुकी जमतात.

    १९५९ चा मिझो दुष्काळ, १९६६ ची मिझो (लुशाई) बंडखोरी आणि जनरल सॅम माणेकशॉ…
    तेव्हा लुशाई हिल्स (आताचा मिजोराम) आसामचा एक जिल्हा होता. १९५९ ला लुशाई हिल्स मध्ये मोठ्या प्रमाणात बांबू फुलला आणि त्याला बी आलं. बांबूला फुलं येणं हि वनस्पतीशात्रातली एक दुर्मिळ घटना आहे. बांबू ४० ते ६० वर्षांनी फुलतो. फुलून गेल्यावर त्या बांबूला बी आलं आणि लुशाई हिल्सच्या बांबूचं बी खाऊन उंदरांची संख्या हजारो पटींनी वाढून त्यांनी बांबूचं बी संपल्यावर अन्नधान्य; विशेषतः भाताच्या साठवलेल्या आणि शेतातल्या पिकावर आपला मोर्चा वळवला. याने अभूतपूर्व दुष्काळ पडला. या दुष्काळाला मिझो भाषेत “मौतम” म्हणतात. १९५५ ला मिझो कल्चरल सोसायटीची स्थापना झालेली होती आणि भविष्यातला विभाजनवादी नेता लाल डेंगा याचा सचिव झाला होता; या संस्थेचं पुढे १९६० ला नाव बदलून “मिझो मौतम फ्रंट” करण्यात आलं पुढे याची लोकप्रियता वाढून “मिझो नॅशनल फमाईन फ्रंट” करण्यात आलं. याचा पुढचा अवतार होता “मिझो नॅशनल फ्रंट”, १९६० ला “दुष्काळाच्या काळात भारत सरकारने मिझो समाजाला काहीही दिलं नाही” अशी आवई उठवून, चर्चच्या पाठिंब्याने लाल डेंगाच्या नेतृत्वाखाली मिझो नेते तत्कालीन पूर्व पाकिस्तानात (आताच बांग्लादेश) गेले आणि त्यांना पैसा आणि शस्त्र पुरवठ्याची हमी मिळाली.

    फेब्रुवारी १९६४ ला लाल डेंगा मिझोरामला परत आला आणि त्याने विभाजनवादी युद्धासाठी तरुण सैनिकांच्या भरतीची योजना आखून तो कामाला लागला. १९६५ पर्यंत त्याच्याकडे प्रचंड प्रमाणात पाकिस्तानी शस्त्रांचा खजिना तयार झाला. भारत सरकार या काळात चीन (१९६२) आणि पाकिस्तानी (१९६५) युद्धात व्यस्त असल्याने या घटना दुर्लक्षित राहिल्या.

    १५ ते १८ जानेवारी १९६५ दरम्यान मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात कॉनपुई इथे “मिझो पीपल्स कन्व्हेन्शन” झालं याचा उद्देश “मिझोराम राज्य” नावाची कुकी- मिझो लोकांसाठीची भौगोलिक एकसंध प्रशासनिक व्यवस्था निर्माण करणं हा होता. यात पैते, वैफै, सिमते, झोऊमी, मिझो, चिन, हमार, कुकी, गांगते, कोम, बैते या बृहद “चिन” जातीय समुदायाच्या अर्थात कुकी- चिन- झो समुदायाच्या विविध उपजातींच्या प्रमुख संघटना होत्या.

    १९६६…
    मिझो पीपल्स कन्व्हेन्शन आणि लाल डेंगाची पाकिस्तान वारी यामुळे सैनिकी आणि सैद्धांतिक तयारी पूर्ण झाल्यावर २८ फेब्रुवारी १९६६ ला मिझो नॅशनल फ्रंट ने प्रत्यक्ष सशस्त्र उठाव करून सर्व टेलिफोन तारा तोडून १ मार्चला सरकारी कार्यालयावर हल्ले केले, आयझोल जिल्हाधिकारी टी एस गिल यांनी आसाम रायफल्सच्या फर्स्ट बटालियनच्या मुख्यालयाचा आश्रय घेतला. सिल्चर कडून येणारी सैनिकी मदत रोखण्यासाठी सर्व रस्ते अडथळे उभारून बंद करण्यात आले आणि लाल डेंगाने मिझो स्वातंत्र्याची घोषणा केली.

    दुसऱ्या दिवशी फर्स्ट आसाम रायफल्स बटालियनवर मोठा झाला, १३ सैनिक जाऊनही हल्ला परतवण्यात आला. आसाम सरकारने आयजोल जिल्ह्यात आसाम डिस्टर्ब एरिया ऍक्ट १९५५ आणि आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट १९५८ लागू करून सेना बोलावली.

    ३ मार्चला चारी बाजूने घेरलेल्या फर्स्ट आसाम रायफल्स बटालियनला सैनिकी हेलिकॉप्टर्सनी वाढीव सप्लाय उपलब्ध झाला आणि ४ मार्च १९६६ ला अत्यंत गंभीर परिस्थिती, जिवंत परत यायची शाश्वती नसताना, चारी बाजूंनी बंडखोरांनी घेरलेल्या आयजोलच्या फर्स्ट आसाम रायफल्स बटालियन मुख्यालयात ईस्टर्न कमांडचे तेव्हाचे कमांडर आणि बांग्ला मुक्ती युद्धाच्या वेळचे सरसेनापती लेफ्टनंट जनरल सॅम माणेकशॉ मिग-४ सैनिकी हेलिकॉप्टरने उतरले, त्यांना भारतीय वायुसेनेने हवाई सुरक्षा पुरवली. त्याच दिवशी भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी मिझो बंडखोरांच्या विविध अड्ड्यांवर भीषण बॉम्बहल्ले करून त्यांना जेरीस आणलं. हि स्वतंत्र भारतातील, नागरी वस्त्यांवर केलेली भारतीय वायुसेनेची पहिली आणि आत्तापर्यंतची तरी शेवटची कारवाई होती. यथावकाश मिजो बंडखोरी शांत होऊन शांती प्रस्थापित झाली पण कुकी- चिन- झो राष्ट्रवाद तसाच अपूर्ण राहिला.

    कुकी- बांग्लादेश संबंध…
    याच वर्षी एप्रिलमध्ये बॉम ख्रिश्चन गावात बांग्लादेशी सैन्याने ७ कुकी- चिन वंशीय लोकांची हत्या केल्याचा आरोप कुकी चिन नॅशनल आर्मीने केला होता आणि मे २०२३ मध्ये कुकी चिन नॅशनल आर्मीने केलेल्या हल्ल्यात बांग्लादेशी सैन्याचे २ अधिकारी आणि २ सैनिक मारले गेले होते. म्यानमारी वरवंटा, कुकी ख्रिश्चन “झालेंगाम” च्या राष्ट्रवादी आकांक्षा आणि भारतीय लोकशाही व्यवस्था असा हा त्रिकोण आहे. आपण या लेखात आत्तापर्यंत कुकी-चिन-झो समुदायाचे ब्रिटिश राज, सध्याचं म्यानमार सरकार आणि बौद्ध समुदाय, भारतातील नागा अतिरेकी संघटना, मणिपूरचे हिंदू वैष्णव मैतेई, खुद्द भारत सरकार आणि बांगलादेश सरकार यांच्याशी कसे संबंध आहेत याचा आढावा घेतला. सध्या एक आरोप प्रकर्षाने होत आहे- राज्यातील भाजप सरकार ख्रिश्चन विरोधी हिंसाचार भडकवत आहे हा तो आरोप. या लेखात कुकी आशा -आकांशांचा उहापोह आपण केला, यातून केंद्र/ राज्यातील भाजप सरकारांनी कुकी ख्रिश्चन समुदायासोबत मुद्दाम भांडण उकरून काढलं आहे का याचं उत्तर आपल्याला मिळालं असेलच. ते मिळालं नसल्यास आपण पुढील लेखात कुकी समुदायाच्या अजून वेगळ्या अंगावर प्रकाश टाकू जेणेकरून सध्याची मणिपूर अशांतता नेमकी कुणामुळे निर्माण झाली याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल.
    —- विनय जोशी