भाजप-शिवसेना युती झाल्यास खासदारकीच्या ४८ पैकी ४५ ते ४६ जागांवर विजय होईल – रामदास आठवले

0
791

सातारा, दि. २३ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होईल. हे दोन्ही पक्ष एकत्र आले, तर महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ ते ४६ जागांवर शिवसेना-भाजपचे उमेदवार सहज निवडून येतील. पण विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही हे सांगता येणार नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.

रामदास आठवले म्हणाले, “२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची भाजप आणि शिवसेनेसोबत युती झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४२ जागांवर युतीचा विजय झाला. गेल्या साडेचार वर्षात भाजप आणि शिवसेने या दोघांचीही ताकद वाढलेली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत एकत्र आले, तर ४८ पैकी ४५ ते ४६ जागेवर सहज विजयी होतील. दोन ते तीन जागा काँग्रेसच्या निवडून येतील. भाजप आणि शिवसेना एकत्र न आल्यास शिवसेनेचे जास्त नुकसान होईल. भाजप आणि रिपब्लिकन पक्ष एकत्रितपणे ३० ते ३२ जागांवर विजयी होतील.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे २८२ खासदार निवडून आले. आता आगामी निवडणुकीत भाजपचे ३०० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळण्याचा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करून तसेच बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यात असलेली अनेक वर्षांची दोस्ती लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेने युती करावी, असे ते म्हणाले.”