पुणे शहरात चौरंगी लढतीने रवींद्र धंगेकर अडचणीत

0
359

पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचे टेन्शन वंचितचे वसंत मोरेंनी वाढवले होते. त्यातच आता असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमनेही भर टाकली आहे. एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते आता 25 एप्रिल रोजी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान, लोकसभेसाठी सुंडकेंनी कंबर कसली असून त्यांना एमआयएम पक्षाने मंगळवारी (ता. 23) एबी फार्म दिला आहे. आता अनिस सुंडकेंनी प्रचारावर भर दिल्याने पुण्याची लढत चौरंगी होणार असल्याचे बोलले जाते. पुणे लोकसभेच्या रिंगणात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपचे मुरलीधर मोहोळ, वंचितकडून वसंत मोरे आणि एमआयएमकडून सुंडके हे आपले नशीब आजमावत आहेत. वंचितने महाविकास आघाडीत सहभागी न होता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील दलित आणि मुस्लीम मतांची विभागणी होणार असल्याचे बोलले जात होते. आता यात एमआयएमने उडी घेतल्याने ट्विस्ट निर्माण झाला आहे. एमआयएमच्या या निर्णयामागे भाजप असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

लोकसभेच्या पुणे मतदारससंघात सुमारे साडेतीन लाख मुस्लिम मतदार आहे. ही मते विजयी उमेदवारासाठी निर्णयायक ठरतात. एमआयएमचा उमेदवार रिंगणात उतरल्याने काँग्रेसला फटका बसणार हे निश्चितच आहे. मात्र मुस्लिम समाज हा महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांवर नाराज असल्याने आमचा उमेदवार विजय करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा दावा पुणे एमआयएमकडून करण्यात येत आहे.

एमआयएमच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या मतांवर काहीच परिणाम होणार नसल्याचा दावा शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी Arvind Shinde केला आहे. ते म्हणाले, एमआयएमने उमेदवार उभा केला असला तरी त्याचा आमच्या उमेदवारावर कोणताही परिणाम होणार नाही. यामागे मात्र भाजपचा हात आहे, हे आम्हाला पक्के माहीत आहे. जागा गमावण्याची भीती असल्याने भाजपला आमच्या मतांमध्ये फूट पाडायची आहे. त्यातूनच भाजपने एमआयएमला गळाशी लावून ही खेळी केल्याचा आरोपही शिंदेंनी केला.

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारांना एकत्रितपणे केवळ 65 हजार मते मिळाली होती. ते भाजपचे एजंट आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मतदार या निवडणुकीत योग्य तो कौल देतील, असा विश्वास धंगेकरांची प्रचार मोहीम आखणारे मोहन जोशींनी व्यक्त केला. तर माझ्या विजयात एमआयएमच्या उमेदवार खोडा आणण्याची शक्यता नाही, असे काँग्रेसचे उमेदवार धंगेकरांनी स्पष्ट केले.