प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांकडून माजी आरपीआय कार्यकर्त्याला हंटरने बेदम मारहाण

0
873

बीड, दि. ३० (पीसीबी) – भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी आंबेडकरांच्या समर्थकांनी माजी आरपीआय कार्यकर्त्याला हंटरने बेदम मारहाण करून त्याची अंबाजोगाई पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली. या मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२९)  सायंकाळी पाचच्या सुमारास अंबाजोगाई शहरात घडली.  

मारहाण झालेल्या  माजी आरपीआय कार्यकर्त्याचे नाव महेंद्र निकाळजे असे आहे.

३ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबईत जाहीर सभा आहे. याच सभेला समाज बांधवांना आवाहन करण्यासाठी महेंद्र निकाळजे या कार्यकर्त्याने एक सोशल मीडियात व्हिडीओ तयार केला होता. समाजाला आवाहन करण्यासोबतच भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर अपशब्द वापरले होते.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी महेंद्र निकाळजे या कार्यकर्त्याला अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेदम चोप दिला.  तसेच त्याची धिंड काढत त्याला अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात नेले. निकाळजे हा एलआयसी एजंट होता. तसेच तो आरपीआय  पक्षाचे देखील काम करत होता.