वारजे येथे निगडी-कात्रज ही पीएमपी बस जळून खाक

0
967

वारजे, दि. ३० (पीसीबी) – निगडी-कात्रज या पीएमपी बसला आज (बुधवार) सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. ही घटना वारजे पुलाजवळील रोझरी शाळेसमोर घडली. बसचालकाने प्रसंगावधान दाखवत तातडीने बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास सांगितल्याने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

निगडी ते कात्रज बायपास ही बस सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास वारजे पुलाजवळ आली असताना अचानक बोनेटमधून धूर येत असल्याचे बसचालक रमेश उगले यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बस रस्त्याच्या कडेला घेऊन थांबविली आणि प्रवाशांना तातडीने बसखाली उतरण्यास सांगितले. प्रवासी खाली उतरताच संपूर्ण बसने पेट घेतला. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशामक दलाने येऊन ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.