डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी ‘राष्ट्रीय अध्यक्षांनी’ खेळला रडीचा डाव

0
73

डॉ. अमोल कोल्हे यांच्या अर्जावर काही अपक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर अर्ज बाद झाल्याचं समजून विरोधकांनी फटाक्यांचा जल्लोष केला पण. तो आनंद काही वेळातच मावळला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपक्षांचे आक्षेप फेटाळून लावले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्टिट करून डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी ‘राष्ट्रीय अध्यक्षांनी’हा रडीचा डाव खेळला होता, अशी टीका केली आहे.

शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीची व प्रतिष्ठेची लढत होत आहे. डॉ. कोल्हे यांच्या अर्जावर काही अपक्षांनी व विरोधकांनी आक्षेप घेतला होता. यानंतर काहींनी अर्ज बाद झाल्याचं समजून विरोधकांनी फटाक्यांचा जल्लोष केला. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व आक्षेप फेटाळले. त्यामुळे विरोधकांच्या आनंद काही वेळातच मावळला.

यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, विरोधकांनी हा रडीचा डाव खेळला असून यामागे कोणाचा हात हे दिसून येते. २०१६ मध्ये ओवेसींच्या सभेला मी विरोध केला होता. या संदर्भातील गुन्ह्याविषयी मला कोणतीही कल्पना नव्हती. यावर त्यांचा आक्षेप होता. तसेच चारित्र्य पडताळणीत कोणताही गुन्हा नाही, असे पत्र पोलिसांनी दिले आहे. त्यावरही त्यांचा आक्षेप होता.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे सर्व फेटाळून लावले. यामध्ये जाणीवपूर्वक काहीही लपविण्याचा मुद्दाच येत नव्हता. केवळ विरोधकांना पराभव दिसायला लागल्यामुळे ते रडीचा डाव खेळत आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या व्टिटर अकौंटवरून विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे.

त्यांनी म्हटले की, डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याची ‘राष्ट्रीय अध्यक्षां’नी केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी लोकशाही मार्गाने प्रयत्न होईल, असं वाटलं होतं. पण, त्याऐवजी डॉ. कोल्हे या निष्ठावान आणि स्वाभिमानी मावळ्यासोबत मैदानात लढण्याऐवजी त्यांच्या अर्जावर फालतू आक्षेप घेऊन त्यांना निवडणुकीच्या मैदानातूनच बाहेर ढकलण्याचा ‘राष्ट्रीय अध्यक्षां’च्या गटाने प्रयत्न केला.

हा प्रयत्न म्हणजे पडण्याच्या खात्रीने खेळलेला रडीचा डाव होता. मात्र, हा डाव हाणून पाडल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. पण अर्ज बाद झाल्याचं समजून फटाक्यांचा जल्लोष करणाऱ्या विरोधकांचा आनंद लगेच मावळला. त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना असे त्यांनी म्हटले आहे.