पोलीस शौर्याच्या आठवणीने पंतप्रधान भावूक; राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे केले उद्घाटन

0
586

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रीय पोलीस दिवसानिमित्त राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते झाले. यावेळी निमलष्करी दलाच्या जवानांच्या शौर्याची आठवण काढताना ते काही क्षण भावूक झाले. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील (एनडीआरएफ) जवानांसाठी आता प्रत्येक वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत लडाख येथील हॉट स्प्रिंगमध्ये शहीद झालेल्या आपल्या निमलष्करी दलाच्या १० जवानांच्या आठवणीसाठी पोलीस स्मारक दिवस पाळला जातो. दरम्यान, नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथे राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मोदींनी शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव केला.

मोदी म्हणाले, आजचा दिवस त्या साहसी पोलीस जवानांच्या वीरगाथेला स्मरण करण्याचा दिवस आहे, ज्या जवानांनी लडाखच्या बर्फाळ डोंगरांमध्ये पहिल्यांदा देशाच्या संरक्षणाचे काम करताना आपले सर्वोच्च बलिदान दिले. देशाच्या स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत कर्तव्याच्या मार्गावर चालणाऱ्या जवानांना माझे नमन.