पर्रिकर पुन्हा एकदा गोवा शासकीय रूग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

0
516

पणजी, दि. २४ (पीसीबी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुन्हा एकदा गोवा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पर्रिकर यांना ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, रूग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

पर्रिकर यांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी तसेच अन्य काही चाचण्यांसाठी शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा उठल्या होत्या. पर्रिकर यांना जीवरक्षक प्रणालीवर (लाइफ सपोर्ट सिस्टम) ठेवण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, गोवा सरकारमधील वरिष्ठ मंत्री विजय सरदेसाई यांनी हे वृत्त फेटाळले. पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनीही मुख्यमंत्र्यांना काही वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.

दरम्यान, पर्रिकर गेल्या वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असून मुंबई, दिल्ली आणि अमेरिकेतही त्यांनी उपचार घेतलेले आहेत.