…त्यामुळे राऊतांना याप्रकरणी हिशेब द्यावा लागेल

0
39

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत आणि त्यांच्या जवळच्या साथीदारांच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे परिसरातील जमिनींचा समावेश आहे. प्रवीण राऊतांवरील कारवाईनंतर भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. सोमय्या म्हणाले, या लोकांनी गरीब झोपडपट्टीवासियांना एसआरएअंतर्गत (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) पक्की घरं देण्याच्या प्रकल्पात घोटाळा केला आहे. त्यामुळे राऊतांना याप्रकरणी हिशेब द्यावा लागेल.

किरीट सोमय्या म्हणाले, सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी (२४ एप्रिल) शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांचे साथीदार प्रवीण राऊत यांची गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ७४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. प्रवीण राऊतने पीएमसी बँकेचे ९५ कोटी रुपये पत्राचाळ एसआरएद्वारे स्वतःच्या बँक खात्यात वळवले. त्यातले कोट्यवधी रुपये संजय राऊतांच्या खात्यात गेले. तसेच त्यांनी अलिबागमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. या लोकांनी गरीब झोपडपट्टीवासियांची फसवणूक केली आहे. त्यामुळे राऊतांना याप्रकरणी हिशेब द्यावाच लागेल.

म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधित गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे दाखल केले होते. या कंपनीने २००६ मध्ये पत्राचाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. परंतु, दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. विकासकाने ६७२ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे २०११ मध्ये उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली. म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी भादंवि कलम १२० (ब), ४०९, ४२० अंतर्गत मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांच्या आधारावर ईडी तपास करीत आहे.

आर्थिक गुन्हे शाखेतील प्रकरणाच्या आधारवर ईडीने तपासाला सुरूवात केली. ईडीने गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत आणखी माहिती घेतली असता ही रक्कम पुढे प्रवीण राऊत याने त्याच्या जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्याच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली. त्यानंतर हा तपास शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी व त्यानंतर संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला होता.