नाओमी ओसाका पुन्हा चॅंपियन; जेनिफर ब्रॅडी हिचे आव्हान संपुष्टात

0
234

मेलबर्न,दि.२०(पीसीबी) – जपानच्या नाओमी ओसाका हिने तीन वर्षांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात विजेतेपदाचा मान मिळविला. करोनाच्या संकटामुळे यंदा लांबलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत तिने अमेरिकेच्या २२व्या मानांकित जेनिफर ब्रॅडी हिचे आव्हान ६-४, ६-३ असे संपुष्टात आणले.

पहिल्या सेटमध्ये खऱ्या अर्थाने तुल्यबळ स्पर्धा बघायला मिळाली. गुणांसाठी दोन्ही खेळाडू सारख्या प्रयत्न करत होत्या. पण, ब्रेकची संधी कुणीच साधू शकत नव्हत्या, अखेर दहाव्या गेमला ओसाकाने ही ब्रेकची संधी साधली. या वेळी ब्रॅडीला तिच्या सर्व्हिसने दगा दिला. दहाव्या गेमला ४०-१५ अशी आघाडीवर असताना झालेला डबल फॉल्ट निर्णायक ठरला. येथेच ओसाकाने पहिला सेट जिंकण्याची संधी साधली.

सऱ्या सेटला मात्र ओसाकी सुरवात कमाल झाली. पाठोपाठ दोन सर्व्हिस ब्रेक करत ओसाकाने ४-० अशी निर्विवाद आघाडी घेतली होती. पहिला सेट जिंकल्यानंतर ओसाकाचा हा आवेश काही वेगळाच होता. तिच्या या अनपेक्षित आक्रमकतेने ब्रॅडी एकवेळ चकित झाली. पण, नंतर तिने ओसाकाची एक सर्व्हिस ब्रेक करत तिने आपण हार मानली नसल्याचे दाखवले. त्यानंतरही ती प्रतिकार करत राहिली. खास करून ब्रॅडीचे फोरहॅंड हमखास गुण आणत होते, तर ओसाकाचे क्रॉसकोर्ट फटके नेटला धडकून बाहेर जात होते.

पण, वेळीच ओसाकाने आपल्या खेळावर नियंत्रण मिळविले आणि संयम राखत तिला चुका करायला भाग पाडले. त्यानंतर नवव्या गेमला अचूक सर्व्हिस करत आपले वर्चस्व राखले. ओसाकाची खोलवर सर्व्हिस ब्रॅडीला घेता आली नाही. तिचा रिटर्न कोर्टबाहेर गेला आणि ओसाकाने रॅकेट डोक्यावर घेत स्मित हास्य करत आपला विजेतेपदाचा आनंद साजरा केला.