आकाशातील मृत्यूला चकवा; उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनमध्ये आगीचा भडका

0
657

डेन्व्हर,दि.२०(पीसीबी) – विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच डावीकडून बाजूस धूर निघू लागला. त्यानंतर इंजिनमध्ये आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेनं विमानातील प्रवाशांना दरदरून घामच फुटला. अमेरिकेतील डेन्व्हेर विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतर ही थरारक घटना घडली आहे.

युनाटेड एअरलाइन्सच्या विमानाने डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ही घटना घडली. अमेरिकेच्या विमान वाहतूक संचालन प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. विमान कंपनीने दिलेल्या माहिती नुसार बोईंग ७७७-२०० हे प्रवासी विमान १० क्रू मेम्बर्स आणि २३१ प्रवाशी घेऊन होनोलूलूकडे निघाले होते. डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनाने पेट घेतला.

त्यानंतर विमान तातडीने पुन्हा डेन्व्हेर विमानतळावर उतरवण्यात आलं. प्रसंगावधान राखत वेळीच विमान उतरवण्यात आल्याने या थरारक घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमान उतरवण्यात आल्यानंतर ब्रुमफिल्ड पोलिसांनी विमानाचे फोटो पोस्ट केले आहेत. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.