महात्मा फुले महाविद्यालयात अभियान

0
37

नवोदीत मतदार म्हणून आम्ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार असून त्यामुळे उत्सुक आणि आनंदी आहोत, हा सुवर्ण क्षण आम्ही आयुष्यभर विसरू नये यासाठी मतदान झाल्यानंतर सेल्फी तसेच फोटो काढून ठेवणार आहोत शिवाय आम्ही आमच्या आई वडिलांनी, काका, काकू, मावशी,आत्या व आजी, आजोबांनीही मतदान करावे यासाठी त्यांना प्रवृत्त करून आम्ही आमचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणार आहोत असा निर्धार पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थ्यांनीनी केला.

     पिंपरी २०६ विधानसभा कार्यालयाच्या वतीने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमातंर्गत, कार्यक्षेत्रात मतदार जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने आज महात्मा फुले महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नवोदीत मतदार असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी मतदारांनी लोकशाही उत्सवात मतदान करून सक्रिय सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

    या कार्यक्रमास नोडल अधिकारी मुकेश कोळप, महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, महात्मा फुले महाविद्यालयाचे उप प्राचार्य शहाजी मोरे, मृणालिनी शेखर, प्राध्यापक डॉ.पांडुरंग भोसले, संग्राम गोसावी, रूपाली जाधव तसेच विविध विभागाचे अध्यापक , कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

    महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनींनी यावेळी "लोकशाहीवर निष्ठा ठेवून,लोकशाही परंपराचे जतन करू आणि नि:पक्षपाती तसेच धर्म,वंश,जात,समाज किंवा भाषा यांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही दबावास बळी न पडता निर्भीडपणे मतदान करू" अशी शपथ घेतली.

     महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग यांच्यासह कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ९० इतकी असून महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थीनींची संख्या २२०० इतकी आहे. पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना संकल्प पत्र वाटप करण्यात आलेली असून या संकल्प पत्रांवर आई, वडील तसेच कुटुंबीय सदस्य हे मतदान करणार  असल्याबाबत सांख्यिकी माहिती येत्या २ मे पर्यंत माहिती संकलीत करून घेण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रा.डॉ.पांडुरंग भोसले यांनी यावेळी दिली.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राध्यापक संग्राम गोसावी यांनी केले तर मतदान शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. लोकसभा निवडणूक प्रक्रियेबाबत तसेच मतदान केंद्रावर पूरविण्यात येणा-या सोईसुविधांबाबत सविस्तर माहिती नोडल अधिकारी मुकेश कोळप यांनी दिली.