ठरलं! ‘या’ शुभ मुहूर्तावर रंगणार ‘आयपीएल’चा सोहळा

0
374

नवी दिल्ली, दि.०७ (पीसीबी) : कोरोनाच्या संकटामुळे स्थगत करावी लागलेली १४वी आयपीएल स्पर्धा आता संयुक्त अरब अमिराती येथे पूर्ण केली जाणार आहे. उर्वरित आयपीएलच्या सामन्यांची सुरवात १९ सप्टेंबरला म्हणजे अनंत चतुर्दशीला आणि शेवट १५ ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याला होणार आहे.

बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने एएनआयच्या प्रतिनिधीशी बोलताना ही माहिती दिली. बीसीसीआय आणि संयुक्त अरब अमिराती क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली चर्चा यशस्वी झाली असून, उर्वरित सामना दुबई, शारजा आणि अबु धाबी येथे पार पडणार आहेत. बीसीसीआयला उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी २५ दिवस आवश्यक होते. ते या कालावधीतच मिळत असल्यामुळेच या तारखा निश्चित करण्यात आल्या, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.

परदेशी खेळाडू खेळण्याविषयी बीसीसीआय आशावादी आहे. त्यांच्याबरोबर चर्चा सुरू असून, ते खेळतील अशी आशा करुयात अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. अर्थात, ही नाण्याची एक बाजू झाली. बीसीसीआयची खरी भूमिका परदेशी खेळाडू आले तर त्यांच्याबरोबर नाही, तर त्यांच्याशिवाय अशीच आहे. त्यामुळेच परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीबाबत कुणीच बोलत नाही. सगळ्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे. जे खेळाडू येणार नाहीत त्यांच्यावर भविष्यात काय कारवाई करता येईल या विषयी सध्या खल सुरू आहे.

फ्रॅचाईजीनी देखील परदेशी खेळाडूंबाबत सर्वाधिकार जणू बीसीसीआयला दिले आहेत. बीसीसीआय परदेशी खेळाडूंच्या संपर्कात असून, ते निश्चित त्यांना खेळण्याबाबत राजी करतील असा विश्वास फ्रॅंचाईजींना वाटत आहे.

अगदीच काही परदेशी खेळाडू आले नाहीत, तर आम्हाला संघ बांधणीसाठी म्हणजे संघात समतोल राखण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे सध्या तरी परदेशी खेळाडू याबाबत तोंडावर बोट ठेवलेलेच बरे असे फ्रॅंचाईजींचे प्रवक्ते बोलत आहेत.