आमच्याकडे बघून मुद्दाम हसतो का, आता तुला दाखवतो’, असे म्हणून केले गंभीर जखमी

0
329

चिखली, दि. ७ (पीसीबी) – शुल्लक कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला दगड, फरशी आणि काचेच्या बाटलीने बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 6) दुपारी पाच वाजताच्या सुमारास भिमशक्तीनगर, ताम्हणे वस्ती, चिखली येथे घडली.

किरण बळीराम साळवे (वय 24, रा. भिमशक्तीनगर, ताम्हणे वस्ती, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित पंडित, रोहन पंडित आणि अमर पोटभरे (सर्व रा. भिमशक्तीनगर, ताम्हणे वस्ती, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी किरण त्यांचे मित्र रंजित बनसोडे आणि अमित गायकवाड असे तिघेजण भिमशक्तीनगर, ताम्हणे वस्ती, चिखली येथे गप्पा मारत बसले होते. त्यांच्या शेजारी त्यांच्याच वस्तीतील ओळखीचे आरोपी देखील बसले होते. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांमध्ये मस्करी सुरू असल्याने ते हसत होते. त्यावेळी अचानक आरोपी फिर्यादी यांच्याकडे आले. ‘आमच्याकडे बघून मुद्दाम हसतो का, आता तुला दाखवतो’, असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रोहन पंडित याने फरशीचा तुकडा फिर्यादी यांच्या डोक्यात मारला. अमर पोटभरे याने फिर्यादी यांच्या पाठीत दगड मारला. तर रोहित पंडित याने काचेची बाटली फिर्यादी यांच्या डाव्या खांद्यावर आणि दंडावर मारून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.