जातीय वैमनस्य, धार्मिक तेढ, तिरस्कार निर्माण करणारी माहिती पसरविल्यास कठोर कारवाई

0
495

पिंपरी, दि. 2 (पीसीबी): समाजामध्ये जातीय वैमनस्य, धार्मिक तेढ, तिरस्कार निर्माण करणारी अनधिकृत माहिती आणि संदेश पसरविल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. याबाबतची माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात काही समाजकंटक आणि गुन्हेगारी वृत्तीचे लोक दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे संदेश अथवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात.
कोरोना बाधित व्यक्तींची संख्या, त्यांच्यावरील उपचार आणि बळींची संख्या, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला परिसर आणि व्यक्तींबाबत खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवली जात आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण तयार होत आहे.

सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अशा समाज विघातक कृत्य आणि लोकांवर पोलीस बारीक लक्ष ठेऊन आहेत. सामाजिक शांतता भंग करणारा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच संबंधितांवर कठोर कारवाई केली जात आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेला आदेश 1 जून ते 30 जून या कालावधीत लागू राहणार आहे. दरम्यान, अनधिकृत बातम्या, निराधार माहिती पसरविण्यावर बंदी आहे.
सोशल मीडिया, एसएमएस, व्हाट्स अप, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, हॅलो, टेलिग्राम, अन्य डिजिटल माध्यमांमध्ये प्रक्षोभक व आक्षेपार्ह माहिती पसरवू नये, असे आदेशात सांगण्यात आले आहे.
अशी माहिती सोशल मीडियावरील ग्रुपवरून प्रसारित झाल्यास ग्रुप अॅडमिन, वैयक्तिक अकाउंटवरून प्रसारित झाल्यास संबंधित व्यक्तीला जबाबदार धरून भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कारवाई केली जाणार असल्याचेही आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.