पंधरा दिवसांपूर्वी गायब झालेल्या कोरोनाग्रस्त आजोबांचा मृतदेह केईएम च्या शवागरात

0
341

मुंबई,दि.२(पीसीबी) : कोरोना साथीचे उपचार सुरू असताना अनेक रुग्णालयांत गोंधळाची स्थिती आहे. मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झालेले असताना दुसरीकडे ती व्यक्ती आयसीयुमध्य असल्याचे उघड होते. दुसरीकडे केईएममध्ये आयसीयु मध्ये दाखल ७५ वर्षांचे आजोबा १५ दिवसांपूर्वी अचानक गायब होतात आणि त्यांचा मृतदेह थेट शवागरात मिळतो, असेही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
मुंबईतील केईएम रुग्णालयातून अचानक गायब झालेले ७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण सुधाकर खाडे यांचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहात सापडला. खाडे यांचा मृतदेह नातेवाईकांनी ओळखला असून ताब्यातही घेतला आहे. सुधाकर खाडे हे गायब झाल्याने याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. याप्रकरणी खाडे कुटुंबियांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील मदत केली. किरीट सोमय्या यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती. यानंतर शोधाशोध झाली आणि अखेर सुधाकर खाडे यांचा मृतदेह सापडला.
सुधाकर खाडे यांना थंडी, ताप आणि श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी 14 मे 2020 रोजी लालबागच्या खासगी रुग्णालयात नेलं. त्यानंतर त्याचदिवशी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सुधाकर खाडे यांना पहिल्या दिवशी केईएम रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये ठेवलं. त्यांची कोरोना टेस्ट केली गेली. टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना ओपडीमध्येच ठेवण्यात आलं. 15 मे 2020 रोजी त्यांच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर खाडे यांना ICU वॉर्ड नं 20 मध्ये ठेवण्यात आलं. रुग्णालयात त्यांची नात, पुतणी, मुलगी आणि जावई रात्रभर हजर होते. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सगळ्यांना घरी पाठवलं. याशिवाय काही प्रोब्लेम असेल तर आम्ही फोन करुन सांगू, असं डॉक्टरांनी सांगितलं.
मुंबई महापालिकेने सुधाकर खाडे यांच्या पत्नी आणि बहिणीला भोईवाडा येथे क्वारंटाईन केलं. दरम्यान, 19 मे रोजी सकाळी 5 वाजता अचानक केईएम रुग्णालयातून खाडे यांच्या जावईंना फोन आला. या फोनमध्ये “तुमचा पेशंट खाटेवर नाही. आम्ही तपास करतो दुसऱ्या कुठल्या वॉर्डमध्ये आहे का? आणि तुम्हाला कळवतो”, असं सांगण्यात आलं.
याप्रकरणी सुधाकर खाडे यांचे जावई यांनी 25 मे रोजी भोईवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. याशिवाय खाडे यांचे पुतणे पुरुषोत्तम खाडे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे देखील तक्रार केली. किरीट सोमय्या यांनी पुरुषोत्तम खाडे यांच्यासोबत जावून संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी रुग्णालय, महापालिका आणि पोलीस यांच्यासोबत बोलून पाठपुरावा केला. याशिवाय त्यांनी याबाबत ट्विटरवरदेखील माहिती दिली होती.