जगप्रसिद्ध गायकाचा अर्धा चेहरा पॅरालाइझ्ड, भारतदौराही रद्द…?

0
299

मुंबई,दि.११(पीसीबी) – जगभरात मोठी फॅन फॉलोइंग असणारा जस्टिन बीबर हा गायक एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. स्वत: जस्टिनने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. जस्टिन रामसे हंट सिंड्रोम या आजाराने त्रस्त आहे, ज्यामुळे त्याचा अर्धा चेहरा पॅरालाइझ्ड झाला आहे. त्याने व्हिडिओ शेअर करत असे म्हटले आहे की काहीसा ब्रेक घेऊन त्याचे पुढील शो रद्द करत आहे.

जस्टिन बीबर याने व्हिडिओ शेअर करत असे म्हटले आहे की, एका भयंकर व्हायरसमुळे तो या सिंड्रोमशी सामना करत आहे. हा व्हायरस त्याच्या चेहऱ्याच्या आणि कानांच्या नसांवर हल्ला करत आहे. त्यामुळे त्याचा चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. जस्टिनने या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की त्याचा एका बाजूच्या डोळ्याची उघडझाप करता येत नाही आहे. शिवाय एका बाजूने हसता देखील येत नाही आहे. त्याचे नाक देखील हलत नसल्याचे या व्हिडिओमधून दिसते आहे. जस्टिनने यावेळी म्हटले आहे की, यातून बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे माहित नाही. मात्र तो विश्रांती घेऊन आणि थेरपीच्या माध्यमातून बरा होत आहे.

जस्टिनने अशी माहिती दिली की गेल्या काही दिवसांपासून त्याचे काही शोज रद्द झाले आहेत. त्यामागचे कारणही हेच आहे की त्याला शारिरिकदृष्ट्या ते शक्य होत नाही आहे. हा फार गंभीर आजार आहे. तो पूर्णपणे ठीक होण्यासाठी आराम करणार आहे. ‘माझं शरीर मला थोडं Slow Down व्हायला सांगत आहे’, असं यामध्ये जस्टिन म्हणाला आहे. जस्टिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हॉलिवूडमधील त्याचे सहकारी, त्याचे देशभरातील चाहते देखील त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. जस्टिनने देखील त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन या पोस्टमधून केले आहे. दरम्यान बीबर कुटुंबीयांवर लागोपाठ संकटं येत आहेत, यावर्षी मार्चमध्ये जस्टिनची पत्नी हेली बीबर हिला देखील मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान जस्टिन बीबर त्याच्या ‘जस्टिस’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील विविध देशांमध्ये दौरा करणार होता. दरम्यान त्याचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. जस्टिन बीबर भारतात येणार असल्याचे वृत्तही समोर आले होते. आता या आजारामुळे त्याचा भारतदौराही रद्द होण्याची शक्यता आहे. याआधी २०१७ साली जस्टिन भारतात आला होता.