BMC मधील 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द;नेमकं प्रकरण काय?

0
2

दि.२१(पीसीबी)-मुंबई महानगरपालिकेत अभियंत्यांच्या बदल्यांवरून निर्माण झालेला वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. कथित भ्रष्टाचार आणि ‘ट्रान्सफर मार्केट’च्या आरोपांनंतर अखेर 122 अभियंत्यांच्या बदल्या प्रशासनाने पूर्णपणे रद्द केल्या आहेत.ऑक्टोबर 2025 मध्ये या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक व्यवहार झाल्याचे गंभीर आरोप समोर आले. या आरोपांची दखल घेत आरटीआय (RTI)कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजपचे शहराध्यक्ष अमित साटम यांनी तक्रारी दाखल केल्या.

या तक्रारींनंतर तत्कालीन आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani)यांनी तत्काळ बदल्यांना स्थगिती दिली होती. त्यानंतर महापौर रितू तावडे (Ritu Tawde)यांनीही प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीची मागणी केली. प्रकरण अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे (Avinash Dhakane)यांच्याकडे सोपवण्यात आले.सखोल तपास आणि वाढत्या दबावानंतर अखेर प्रशासनाने यू-टर्न घेत 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत आदेशात ऑक्टोबर 2025 मधील सर्व बदली आदेश मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हा निर्णय एकीकडे भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई म्हणून पाहिला जात असला, तरी दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बदल्या रद्द होणे ही प्रशासनातील गंभीर अनियमिततेची कबुली मानली जात आहे.दरम्यान, भविष्यातील बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि स्वतंत्र समितीमार्फत राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. BMC मधील कथित ‘ट्रान्सफर मार्केट’ प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.