दि.२१(पीसीबी)-मुंबईच्या उपनगरी रेल्वे सेवेत सोमवारी झालेल्या अपघाताचे पडसाद आजही उमटताना दिसत आहेत.डोंबवली रेल्वे स्टेशन (Dombivli Railway Station) येथे लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरल्यानंतर रेल्वेची संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेचा फटका आज दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना सहन करावा लागत आहे.आज सकाळी दिवा रेल्वे स्टेशन (Diva Railway Station) येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूंना टोकापर्यंत खच्चून गर्दी झाली असून, महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय होती. या गर्दीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल गाड्या आजही 20 ते 25 मिनिटांच्या उशिराने धावत आहेत. सोमवारी रात्री खर्डी परिसरात घेण्यात आलेला मेन्टेनन्स ब्लॉक नियोजित वेळेपेक्षा उशिरा संपल्याने सकाळच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.दरम्यान, सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली स्थानकाजवळ कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनचा प्रथम श्रेणीचा डबा रुळावरून घसरला होता. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती मोहीम राबवत दोन ते अडीच तासांत डबा पुन्हा रुळांवर आणला.
जरी त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली असली, तरी गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. परिणामी, काल आणि आजही लाखो प्रवाशांना प्रचंड गर्दी आणि उशिराचा सामना करावा लागत आहे.या घटनेमुळे मुंबईतील उपनगरी रेल्वे व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.










































