चिंचवड बिनविरोधसाठी भाजपचा आटापीटा, महाआघाडीची ताकद बरोबरीत असल्याने विरोधक तयारीत

0
307

– देगलूर विधानसभा, मावळ लोकसभा, महापालिका पराभवाची सल अजित पवार यांना कायम

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांची महाआघाडी म्हणून जवळपास बरोबरीत ताकद असल्याने तसेच आगामी महापालिका निवडणुकित पुन्हा सत्ता पाहिजे असल्याने पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची सुतराम शक्यता नाही. यापूर्वी पंढरपूर-देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकित राष्ट्रवादीची जागा भाजपने हिसकावून घेतल्याची सल तसेच मावळ लोकसभातील परभाव आणि महापालिका हातातून घेतल्याचा राग स्वतः अजित पवार यांना असल्याने भाजपच्या विनंतीचा कितपत विचार होईल याबाबत साशंकता आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे २००९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ७८ हजार मते घेऊन जिंकले. नंतर २०१४ मध्ये भाजपकडून १ लाख २३ हजार मते मिळाली आणि त्यांनी शिवसेनेच्या राहुल कलाटे यांचा पराभव केला. त्या निवडणुकित राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, दोन बलाढ्य अपक्ष असे सर्वजण स्वतंत्र असल्याने जगताप विरोधकांची मते बरोबरीत असून ती विभागल्याने भाजपचा विजय सोपा होता. पुढे २०१९ मध्ये भाजपकडून १ लाख ५० हजार मते घेऊन जगताप यांनी हॅट्रीक केली, पण त्यांच्या विरोधात सर्वांनी मिळून शिवसेनेच्या राहुल कलाटे यांना पाठबळ दिल्याने चुरस झाली. अपक्ष लढलेल्या कलाटे यांनी तब्बल १ लाख १२ हजार मते मिळाली होती. आता जगताप समोर नाहीत आणि त्यांच्या तोडिचा दुसरा उमेदवार भाजपकडे नसल्याने विरोधकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

आमदार जगताप यांचे धाकटे भाऊ माजी नगरसेवक शंकर किंवा पत्नी आश्विनी यांची नावे भाजप उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. पत्नी म्हणून आश्विनी यांनी मोठी सहानुभूती आहे, पण भाजपमधून आगामी काळात संघटन आणि महापालिका निवडणुका जिंकायच्या तर शंकर जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे विनंती करून ही जागा भाजपला बिनविरोध द्यावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्षात अजित पवार यांच्या एकहाती सत्तेला पिंपरी चिंचवड शहरात सुरूंग लावण्याचे मोठे धाडसाचे काम दिवंगत आमदार जगताप यांनी करून दाखवले होते. त्याशिवाय मावळ लोकसभेला अजितदादांचे चिरंजीव पार्थ हे उमेदवार असताना त्यांचा पराभव झाल्याचे मोठे शल्य त्यांना आहे. आगामी महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीला सत्ता मिळवायची झाल्यास चिंचवड विधानसभा बिनविरोध भाजपला देऊन परवडणारे नाही, याचीही पवार यांना पूरती जाण आहे.

दुसरा महत्वाचा मुद्दा यापूर्वी राज्यात ४ पोटनिवडणुका झाल्या. दिवंगत आमदारांच्या घरात उमेदवारी दिल्यास एक राजकीय सभ्यता म्हणून तिथे विरोधक उमेदवार देत नाहीत, असा प्रघात होता. देगलूर-पंढरपूर पोटनिवडणुकित राष्ट्रवादीने भाजपला मिनतवाऱ्या करूनही त्यांनी उमेदवार दिला आणि राषट्रवादीची ती जागा हासकावून घेतली. कोल्हापूर, मुंबई पोटनिवडणुकित शिवसेनेलाही भाजपने हातापाया पडायला लावले, पण निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. गेल्या तीन वर्षांतील या राजकीय घडामोडी पाहता चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोधची शक्यता दुर्मीळ दिसते आहे.

गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवार तयार –
भाजपने कितीही बिनविरोधच्या बातम्या पेरल्या तरी आता माघार नाही, अशा तोऱ्यात भाजप विरोधक असून आज घोषणा होताच संभाव्य इच्छुकांनी मोर्चेबांधनी सुरू केली आहे. सलग दोन वेळा राहुल कलाटे यांनी जगताप यांच्या विरोधात अत्यंत कडवी झुंज दिल्याने त्यांचे नाव विरोधी गटात आघाडीवर आहे. प्रत्यक्षात महाआघाडी म्हणून निवडणूक लढवायची झाल्यास ही जागा राष्ट्रवादीला की शिवसेनेला हा पहिला वाद आहे. शिवसेनेचे कलाटे यांच्याशिवाय राष्ट्रवादीतून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे यांची नावे स्पर्धेत आहेत. महापालिका पुन्हा जिंकायची तर आता पोटनिवडणूक बिनविरोध नकोच, असा राष्ट्रवादीतील बहुसंख्य प्रमुख कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. २०१९ मध्ये आमदार जगताप यांच्यासारखा प्रचंड शक्तीशाली नेता असूनही भाजप विरोधात तीनही विरोधी पक्षांची मिळून कलाटे यांना मिळालेली मते लक्षणीय आहेत. आता समोर जगताप यांच्यासारखी दिग्गज उमेदवार भाजपकडे नाही आणि तुलनेत विरोधकांकडे ताकदिच्या इच्छुकांची संख्या चांगली आहे. भाजपने श्रीमती जगताप यांना संधी दिलीच तर थोडाफार सहानुभूतीचा फरक पडेल अन्यथा शंकर जगताप असतील तर विरोधकांचे पारडे जड राहिल, असा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाही अंदाज आहे.