कोरेगावमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या शाखाधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0
521

कोरेगाव, दि. ६ (पीसीबी) – आयसीआयसीआय बँकेच्या शाखाधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवार (दि.५) शिंदेवाडी ता. खटाव येथे घडली.

पंकज शिवाजी गायकवाड (वय २७, रा. शिंदेवाडी, ता. खटाव) असे आत्महत्या केलेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शाखाधिकारी महेश पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा वडूज येथील आयसीआयसीआय या बँकेत दोन वर्षे कॉन्ट्रक्ट बेसेसवर काम करत होता. त्यानंतर त्याने या बँकेची परीक्षा देऊन त्याच बँकेत रिलेशनशीप ऑफिसर म्हणून पद मिळविले. एक वर्षे पुणे येथील बँकेच्या शाखेत काम केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून पंकज कोरेगाव येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत काम करत होता. शिंदेवाडीतून तो कामावर ये जा करत होता.  दरम्यान, वर्षेभरापासून बँकेचे शाखाधिकारी महेश पाटील हे पंकजच्या मोबाईलवर सातत्याने कामावरून काढून टाकेन, अशी विनाकारण धमकी देत होते. ‘तुझे काम बरोबर नाही, तुला कामावरून काढून टाकणार आहे, तू त्याच लायकीचा आहे, तुझा प्रवासभत्ता बील मंजूर करणार नाही, काय करायचे ते कर,’ अशी वारंवार धमकी देत होते.

याबाबत पंकज याच्या मोबाईलवर या दोघांतील संभाषण रेकॉर्डींग झालेले आहे. त्याने दिवसभर इतरत्र फिरून आणलेली कामे संबंधित शाखाधिकारी दुसऱ्या व्यक्तीच्या नावे सातत्याने टाकत होते. ‘तुझ्यामुळे बँकेचा परफार्मन्स खाली आला आहे. कामावरून तरी काढून टाकतो नाही तर तुझी बदलीच करतो,’ अशी धमकी त्याच्या व्हॉट्सअॅपवर त्यांच्याकडून दिली जात होती. घरची जबाबदारी अंगावर असल्याने जर कामावरून काढून टाकले तर काय होईल, त्यामुळे पंकज गेल्या चारपाच दिवसांपासून मानसिक धडपणाखाली व प्रचंड दबावाखाली होता. या त्रासाला कंटाळून त्याने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुसेगाव पोलीस तपास करत आहेत.