विरोधी उमेदवाराची ‘बनवाबनवी’ आणि ‘नौटंकी’ चालणार नाही – अजित पवार

0
34
  • निवडणुकीत ‘गडबड’ करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कामच करून टाकीन – अजित पवार
  • विकास कामांसाठी केंद्राचा मोठा निधी हवा असल्याने महायुतीला विजयी करा – अजित पवार

पिंपरीत आमदाराच्या मुलीच्या स्वागत समारंभात माझं लक्ष नसताना विरोधी आघाडीच्या उमेदवाराने पाय पकडून, माझे आशीर्वाद घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची ‘बनवाबनवी’ केली. अशी बनवाबनवी व नौटंकी चालणार नाही, असा थेट इशारा दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (गुरुवारी) दिला. मावळात धनुष्यबाणाचेच काम करायचे ही आपली स्पष्ट भूमिका असताना कोणी गडबड करताना दिसले, तर त्या कार्यकर्त्याचे कामच करून टाकीन, या शब्दांत अजितदादांनी सज्जड दमही भरला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कामशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे तसेच भाऊ गुंड, गणेश खांडगे, रवींद्र भेगडे, शरद हुलावळे, राजू खांडभोर, गणेश आप्पा ढोरे, माऊली शिंदे, प्रशांत ढोरे, नितीन मराठे, सचिन घोटकुले, नीलेश तरस, जितेंद्र बोत्रे, सुभाष जाधव, सुरेखा जाधव, सायली बोत्रे, दिपाली गराडे, बाबुराव वायकर, गणेश काकडे, विठ्ठल शिंदे, सुनील दाभाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधी उमेदवाराचा खरपूस समाचार

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव न घेता पवार यांनी त्याचा खरपूस समाचार घेतला. आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या विवाहाप्रित्यर्थ स्वागत समारंभात उपस्थित राहण्यासाठी गेलो असता, माझे त्याच्याकडे लक्ष नव्हते. पण तो टपूनच बसला होता. पठ्ठ्याने माझे पाय पकडून फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत जणू अजितदादांचा आपल्याला आशीर्वाद आहे, असा बनाव त्याने केला. ही असली बनवाबनवी, नौटंकी चालणार नाही, या शब्दात त्यांनी खडसावले.

अजित पवार म्हणाले की, ही निवडणूक देशाची आहे. नात्यागोत्याची नाही. जय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्यामुळे आम्ही महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाकडून भविष्यात मोठ्या प्रमाणात निधी मिळवायचा असेल तर मावळातून बारणे पुन्हा खासदार होणे आवश्यक आहे. ‘एक घाव, दोन तुकडे’ हा माझा स्वभाव आहे. मावळात फक्त आणि फक्त धनुष्यबाण चालवायचे, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. तालुक्यातील वरिष्ठ नेते काम करीत असले तरी खालच्या फळीतील काही कार्यकर्ते ‘गडबड’ करताना दिसत आहेत. त्यांनी वेळीच सुधारणा करावी, अन्यथा त्यांचे कामच करून टाकीन.

खासदार बारणे हे 10 वर्षे लोकसभेत मावळचे प्रतिनिधित्व करीत आहेत. उत्तम जनसंपर्क असलेला हा नेता असून, त्याचा या भागाला फायदा झाला आहे. संसदेत प्रभावी काम करण्याबरोबरच त्यांनी मतदारसंघाचाही मोठ्या प्रमाणात विकास केला आहे, असे पवार म्हणाले.

‘पावण्याला जेवण घाला, पोशाख करा आणि घरी पाठवा’

ही देशाची निवडणूक असल्यामुळे नात्यागोत्याचा विचार करू नका. नातीगोती सांगत कोणी मते मागायला आला तर त्याला जेवण घाला, हवं तर पोशाख ही करा, खूपच प्रेम असेल तर अंगठी द्या आणि घरी पाठवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्यामुळे आप्पा बारणे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय निश्चित आहे. त्यांना किमान अडीच लाखांचे मताधिक्य मिळेल. पिंपरी, चिंचवड व मावळ मतदारसंघाच्या तोडीचे मताधिक्य आम्ही रायगड जिल्ह्यातून देऊ. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे मावळ तालुक्यातील जागा अडचणीत असतील तर त्याबाबत सकारात्मक प्रस्ताव तयार करून त्याला केंद्र शासनाची मंजुरी घेण्यात येईल. जनरल मोटरच्या कामगारांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. याबाबत नवीन ह्युंदाई कंपनीला सूचना देण्यात आल्या आहेत.

‘शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा हे विकास’

खासदार म्हणून निवडून आल्यापासून आपण सातत्याने विकास कामे केले आहेत, असे सांगून बारणे यांनी दहा वर्षात केलेल्या कामांचा आढावा सादर केला. शहरी भागातील कामांबरोबरच आदिवासी वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्ते, वीज, पाणी पोहोचविण्याचे काम केले आहे. मतदारसंघातील गावागावापर्यंत निधी पोहोचवला आहे.

पुणे लोणावळा लोहमार्गाची चौपदरीकरणासाठी महायुतीने अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कार्ल्याच्या एकविरा देवस्थान सठी 59 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कान्हे येथे रेल्वे उड्डाणपूल मंजूर झाला आहे, स्थानिक रहिवाशांशी चर्चा करून भूसंपादनाचा विषय लवकरच मार्गी लावला जाईल. मिसाईल प्रकल्पासाठी जागे बाबत न्यायालयातील खटले मागे घेण्याचे आवाहन संरक्षण मंत्र्यांनी केले होते, मात्र शेतकऱ्यांनी भूमिका न घेतल्याने तो विषय मार्गी लागण्यास विलंब होत आहे, असे बारणे म्हणाले.

मतदार संघात महायुतीची ताकद मोठी आहे. त्यामुळे विरोधी उमेदवाराला त्याच्या डिपॉझिटची काळजी करावी लागेल, असा शेराही बारणे यांनी मारला.

दुहेरी भूमिका घेणाऱ्यांची नावे जाहीर करणार – शेळके

राष्ट्रवादीचे बहुतांश कार्यकर्ते महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळत आहेत, मात्र काही जण दिवसा ‘धनुष्यबाण’ व रात्री ‘मशाल’ करत असतील तर त्यांची नावे निवडणुकीच्या निकालानंतर जाहीर करीन, असा इशारा आमदार शेळके यांनी दिला. विरोधी उमेदवाराकडे 50 टक्के बुथवर काम करायला कार्यकर्ता नाही. 95 टक्के मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे मावळातून बारणे यांना विक्रमी मताधिक्य मिळेल, असे बाळा भेगडे म्हणाले. तुरुंग विरोधकांना लावायचा आहे महायुतीला नाही, असा प्रतिटोला त्यांनी आमदार शेळके यांना लगावला.