शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज.

0
93
  • पतसंस्थेत नेमकं चाललंय काय ? ठेवीदारांना डॉ. कोल्हेंनी केलं सावध..!

शिरुर | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेत चाललेल्या गैरप्रकारांचा पाढा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाचून पतसंस्थेच्या ठेवीदारांना सावध केले आहे. पतसंस्थेत शिपायाची नोकरी करणाऱ्या आणि आढळराव पाटलांचा सोशल मीडियावर प्रचार करणाऱ्या एका व्यक्तीच्या नावावर तब्बल ९५ लाखांचं कर्ज त्यांच्याच संस्थेतून दिल्याच्या चर्चा असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

शिरुर येथे डॉ कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची आज (दि. ८ रोजी) रोजी सभा पार पडली या सभेत बोलताना डॉ. कोल्हे यांनी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेत सुरू असलेल्या गैरकारभराची चर्चाची माहिती भर सभेत दिली. त्यांनी सांगितले की, भैरवनाथ महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या एका पतसंस्थेची परिस्थिती आणि सुरू असलेल्या चर्चेवर पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराला पतसंस्था चालकाने उत्तर देणं गरजेचे आहे. ठेवीदारांच्या कष्टाचे पैसे पतसंस्थेत ठेवले जातात आणि इकडे केवळ पतसंस्थेत शिपायाची नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर तब्बल ९५ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. एकूण कर्जावर व्याज पकडून ढोबळमानाने ग्राह्य धरला तर महिन्याला १ लाख २० हजारांचा हप्ता जातो. तर या शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला किती पगार मिळतो असा सवाल डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केला.

एवढ्यावरच न थांबता आढळराव पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावरील कर्जाचा उल्लेख टाळून मॅनेजरच्या नावावरील कर्जाची यादी डॉ. कोल्हे यांनी वाचून दाखवली. यामध्ये मॅनेजरच्या नावावर १ कोटी २१ लाखांचे कर्ज, दुसऱ्या मॅनेजरच्या नावावर १ कोटी रुपये, तिसऱ्या मॅनेजरच्या नावावर १ कोटी २ लाख रुपये, चौथ्या मॅनेजरच्या नावावर १ कोटी रुपयांचे कर्ज. असे तब्बल ११ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज आहे तर हे पैसे कसे, कुठे आणि कोण वापरणार आहे ? असा सवाल डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना केला. तर पुढे आढळराव पाटील यांना इशारा देत डॉ. कोल्हे म्हणले की, मला एकदा तुम्ही मला महागद्दार म्हणाला होतात, मग सर्वसामान्य ठेवीदारांशी तुम्ही केलेली ही कोणती गद्दारी आहे ? याचं उत्तर सर्वसामान्य कष्टकरी ठेवीदारांना तुम्हाला द्यावे लागेल.

दरम्यान पतसंस्थेतेतील कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज काढून हे पैसे स्वतः आढळराव पाटील तर वापरत नसतील ना ? किंवा हे पैसे नेमकं कोण वापरत आहे ? असा डॉ. कोल्हे यांनी अप्रत्यक्ष सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे भैरवनाथ सहकारी पतसंस्थेत गैरकारभार करून सर्वसामान्य ठेवीदारांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न आढळराव पाटील करत असल्याचा अस्पष्ट आरोप यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. यावर आढळराव पाटील नेमकं आता काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचे असणार आहे.