खासदार बारणे यांनी पनवेलमध्ये डॉक्टर आणि वकिलांशी साधला ‘नमो संवाद’

0
36
  • डॉक्टर व वकिलांच्या समस्या चर्चेतून सोडवणार – बारणे
  • नागरिकांचा जगण्याचा हक्क व मालमत्तेचा हक्क यांचे केले मोदींनी रक्षण – प्रशांत ठाकूर

पनवेल, दि. 8 मे – डॉक्टर व वकील या दोघांचे समाजासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्यात येतील तसेच मागण्यांची पूर्तता देखील करण्यात येईल, अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनी खांदा कॉलनी येथील खान्देश हॉटेलमध्ये डॉक्टर व वकिलांसाठी ‘नमो संवाद’चे आयोजन केले होते. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमल, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ तसेच नामवंत वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अरुण भगत, डॉ. गिरीश गुणे, डॉ. रमेश पटेल, डॉ. राहुल कुलकर्णी तसेच अनिल भगत, शिवाजी थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.

पनवेल परिसरातील डॉक्टर व वकिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या खासदार बारणे यांनी समजून घेतल्या. निवडणूक झाल्यानंतर यासंदर्भात समक्ष भेटून व सविस्तर चर्चा करून समस्या सोडवल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या दहा वर्षात वैद्यकीय पेशाला चांगली चालना दिली आहे. आयुर्वेदाबरोबरच होमिओपॅथीलाही प्रोत्साहन देण्याचे त्यांचे धोरण आहे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र मंत्रालय देखील चालू केले आहे. देशातील आरोग्य विषयक पायाभूत सुविधा गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. देशात झालेली प्रगती, घेतलेले चांगले निर्णय लक्षात घेता मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. चांगला काळ येतोय राहिलेल्या समस्या भविष्यात नक्की सुटतील. त्यासाठी मोदींचे नेतृत्व सक्षम आहे.

न्यायदानात होत असलेला विलंब ही सर्वसामान्यांना भेडसावणारी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी न्यायव्यवस्थेला आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे, असेही बारणे यांनी सांगितले.

नागरिकांचा जगण्याचा हक्क व मालमत्तेचा हक्क यांचे नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात रक्षण केले आहे, असे सांगून आमदार ठाकूर म्हणाले की, कोरोनाच्या काळात भारतात लस बनवून कोट्यवधी भारतीयांचे प्राण वाचवले. 370 वे कलम रद्द केल्यामुळे आता आपण काश्मीरमध्येही प्रॉपर्टी करू शकतो.‌ वैद्यकीय उत्पादनाबाबतही मोदी यांनी भारताला स्वावलंबी बनवले.‌ अडचणीच्या काळात भारताने इतर देशांना मदत केल्यामुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. पनवेलमध्ये वैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी अवाजवी शुल्क आकारण्यात येत आहे. याप्रकरणी महापालिकेच्या माध्यमातून तोडगा काढून देण्यात येईल. सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी पनवेलमध्ये काही न्यायालये सुरू करण्यात येतील.

ॲड. मनोज भुजबळ, डॉ. अरुण भगत, डॉ. राहुल कुलकर्णी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रथमेश सोमण यांनी सूत्रसंचालन केले.