केबल इंटरनेटचे जाळे गुन्हेगारांकडे सोपविण्याचा प्रयत्न हाणून पाडा, राष्ट्रवादी काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे मागणी

0
305

पिंपरी, दि. २२ – पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेटचे संपूर्ण जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधीतांकडे सोपविण्याचा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त कार्यालयात अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून त्यासंदर्भातील एक लेखी निवेदन दिले.

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात अजित गव्हाणे यांच्यासह महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी अध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक राहुल भोसले, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, नारायण बहिरवाडे, सतिश दरेकर, विनायक रणसुंभे, विजय लोखंडे, काशिनाथ जगताप, युवक अध्यक्ष इम्रान शेख यांचा समावेश होता.
दुबई आणि पाकिस्तानशी कायम संपर्क असलेल्या तसेच गुजराथ मधील अहमदाबादमध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज चालविले म्हणून गुन्हा दाखल केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधीतांकडेच पिंपरी चिंचवड शहरातील अंडरग्राऊंड केबल नेटवर्क सोपविण्यात येणार आहे. शहरातील एक बडा नेता आणि महापालिका प्रशासनाचाही त्यासाठी बराच आग्रह आहे. अशा प्रकारे गुन्हेगारांच्या हातात शहरातील अंडरग्राऊंड केबल नेटवर्क सोपविले तर आगामी काळात खूप मोठा धोका संभवतो.

केबल इंटरनेटचे नेटवर्क अशा गुन्हेगारांकडे गेले तर, उद्या डेटा चोरी होऊ शकते. दुबई किंवा पाकिस्तानातून खंडणी उकळण्यासाठी गुन्हेगारांनी फोन केला तरी ते सापडणार नाही.महिला आणि मुलिंच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जातीय तेढ निर्माण कऱण्यासाठीही ही यंत्रणा वापरली जाऊ शकते इतकेच नाही तर अतिरेकी कारवायासुध्दा होऊ शकतात. शहरच नव्हे तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने या निर्णयावर पोलिसांनी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली.

शुक्रवारी (दि.२३) आयोजित स्मार्ट सिटी समितीच्या बैठकित या अत्यंत संवेदनशील अशा विषयावर अंतिम निर्णय होणार आहे. समितीच्या विषयपत्रात त्या विषयाचा समावेश आहे. स्मार्ट सिटीच्या कार्यकारणीचे कार्याध्यक्ष महापालिका आयुक्त असले तरी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त हे पदसिध्द संचालक आहेत. आता त्यांनीच या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि शहराचा घात होऊ नये यासाठी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी गव्हाणे यांनी केली आहे.

केबल इंटरनेटचा उद्देश चांगला, पण –
पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे ६०० किलोमीटर लांबीचे अंडरग्राऊंड केबल डक्ट तयार कऱण्यात आले. तत्कालिन महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी महापालिकेसाठी नवीन उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून हा प्रकल्प हाती घेतला होता. महापालिकेला त्यातून भरघोस उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अंडरग्राऊंड केबलसाठी विविध कंपन्यांकडून वारंवार होणाऱ्या रस्ते खोदाईलाही आळा बसणार आहे. डक्ट भाडेपट्ट्याने देण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने सुमारे ३०० कोटी रुपयांची एक निविदा नुकतीच काढली होती, त्यात तीन कंपन्यांनी सहभाग घेतला. मेसर्स रेलटेल कॉर्पोरेशन, मेसर्स युसीएन केबल या दोन कंपन्यांशिवाय मेसर्स सुयोग टेलिमॅटिक्स लिमिटेड – मेसर्स फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि. या भागीदार कंपनीने निविदा भरली आहे. सुयोग टेलिमॅटिक्स लि.- फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि. या कंपनीची निविदा सर्वोत्कृष्ट ठरली आणि त्यांना काम देण्याची घाई स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सुरू आहे.