चार लाखांचे मोबाईल गहाळ करणाऱ्या चौघांना अटक

0
175

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – फ्लिपकार्टच्या गोडाऊनमधून माल घेऊन तो ग्राहकांना पोहोच करण्याचे काम करणारे डिलिव्हरी बॉयच गोडाऊन मधून मोबाईल गहाळ करायचे. गोडाऊन मधून वस्तू गहाळ झाल्याने त्याचा भुर्दंड ग्राहकांना न येता कंपनीला येत असे. हा प्रकार निदर्शनास आल्याने कंपनीकडून पोलिसात तक्रार देण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी तपास करत चौघांना अटक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मारुंजी येथील फ्लिपकार्ट कंपनीच्या गोडाऊनमध्ये घडला.

सचिन संजय मोरे (वय ३०, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी), राजू बिरेंद्रकुमार गुप्ता (वय ४६, रा. भोईरवाडी, पुणे), ज्ञानदेव विजयकुमार ढवळे (वय २१, रा.डांगे चौक, वाकड), हर्ष केशव वर्मा (वय २४, रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजेश ओमेनकुट्टन (वय ३४, रा. जुनी सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी येथे फ्लिपकार्ट कंपनीचे गोडाऊन आहे. त्यात आरोपी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. आरोपी चौघांनी ऑगस्ट अखेर पासून ते नोव्हेंबर अखेर पर्यंत लाखो रुपयांचे मोबाईल फोन गोडाऊन मधून गहाळ केले. कंपनीच्या तपासणीमध्ये मोबाईल फोन मोठ्या प्रमाणात गहाळ होत असल्याचे निदर्शनास आले. आरोपींकडून चार लाख १२ हजार ६८६ रुपये किमतीचे मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे तपास करीत आहेत.