कमी किमतीत शेअरची खरेदी करून लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

0
558

आकुर्डी, दि. २३ (पीसीबी) – कमी किमतीत शेअर खरेदी करून तसेच खोट्या सह्या करून शेअर ट्रांसफर करून एकाची लाखो रुपयांची फसवणूक केली. याबाबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 जून 2019 पासून 31 मार्च 2019 या कालावधीत आरओसी ऑफिस, आकुर्डी येथे घडला.

भास्कर हनुमंत नाझीकर (वय 27), गीतांजली हनुमंत नाझरकर (वय 28), संगीता हनुमंत नाझरकर (वय 55, तिघे रा. कोथरूड पुणे), पारस दिलीप मुनात (वय 37, रा. सातारा रोड, पुणे), श्रीनिवास देवस्थळे (रा. शनिवार पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संग्राम तानाजीराव सोरटे (वय 41, रा. मगरवाडी, करंजे, ता. बारामती, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. 22) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे अॅप्टीट्यूड इंजिनिअरिंग प्रा ली या कंपनीचे चार लाख 59 हजार 100 एवढे शेअर होते. त्याची फेस व्हॅल्यू प्रत्येक दहा रुपये एवढी होती. असे असताना आरोपींनी फिर्यादी यांच्या परस्पर शेअरची किंमत एक रुपया ठरवून फिर्यादी यांच्या बँक खात्यात चार लाख 59 हजार 100 रुपये जमा केले.

तसेच फिर्यादी यांच्या परस्पर खोट्या सह्या करून त्यांचे शेअर ट्रान्सफर केले. यामध्ये सुमारे 41 लाख 31 हजार 900 रुपयांचा आरोपींनी अपहार केला आहे. तसेच गीतांजली ब्रीडर्स प्रा ली या कंपनीचे फिर्यादी यांच्याकडे तीन लाख 81 हजार 150 शेअर्स होते. त्याची किंमत 38 लाख 11 हजार 500 रुपये असताना आरोपींनी खोट्या सह्या करून खोटे लोक उभे करून त्यातही फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.