कोरोनाची लस घेतल्यानंतर तब्बल 38 दिवसांनी डाॅक्टर पॉझिटिव्ह

0
184

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) – कोरोनाची लस घेतल्यानंतर तब्बल 38 दिवसानंतर महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील डाॅक्टर पॉझिटिव्ह होण्याचा प्रकार घडला आहे. पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांच्या थेट संपर्क येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड योध्दा म्हणून डॉक्टर्स, परिचारिका, इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मागील कित्येक दिवसामध्ये डॉक्टरांसह अन्य कर्मचा-यांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यानूसार शहरात आतापर्यंत 19 हजार 086 इतक्या कोविड योध्दा कर्मचा-यांना लसीकरण केलेले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या सर्व रुग्णालयातील डाॅक्टर व कर्मचारी थेट कोविड पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना लसीकरण करण्यात येवून त्यातील काहीजण कोविड पाॅझिटिव्ह येवू लागले आहेत. यामध्ये भोसरी रुग्णालयातील एका डाॅक्टरला अंगदुखी, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसल्याने तपासणी करण्यात आली. त्यानंतर ते कोविड पाॅझिटिव्ह आले आहेत.

याबाबत डाॅक्टर पवन साळवे म्हणाले की, या डॉक्टरने लसीकरणाअगोदर बाहेर गावी प्रवास केलेला आहे का?, तसेच परतल्यानंतर त्यांना कोणतीही लक्षणे दिसून आली का? याविषयी माहिती घेत आहोत. त्यांचे लसीकरण झाल्यानंतर दुसरा डोस घेतला आहे का? याबाबत तपासणी सुरु आहे. मात्र लसीकरण झाल्यावर 38 दिवसानंतर त्यांना लक्षणे जाणवायला लागली. चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यांची तातडीने विलगीकरण करून वायसीएममध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे लसीकरणानंतर कोणाकोणाला त्रास झाला. त्याचे काही आरोग्यावर काही परिणाम जाणवले का? तसेच अजूनही कोणाला संसर्ग झाला याविषयी माहिती मागविली आहे.