टॉप टेन गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर 

0
1018

पिंपरी, दि. 23 (पीसीबी) प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टॉप टेन सराईत गुन्हेगार पिंपरी चिंचवड पोलिसांच्या रडारवर आले असून त्यांची कुंडली काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या गुन्हेगारांवर तडीपारी, एमपीडीए किंवा मोक्का कायद्यान्वये कडक कारवाई केली जाणार आहे. 

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 15 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 150 गुन्हेगारांवर ही कारवाई होणार आहे. त्यासाठी गुन्हे शाखांसह पोलिस ठाण्यांमधील स्थानिक गुन्हे शाखाही गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे काम करत आहेत. त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्यांचा समावेश आहे.

आगामी विधानसभा निवडणूक व गणपती उत्सव व्यवस्थितपणे पार पडावा, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलिसांकडून या उपाययोजना केल्या जात असून लवकरच ही प्रतिबंधक कारवाई पुर्ण होणार आहे. पुणे शहरातून पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय सुरू झाल्यानंतर पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले. फोनो-फ्रेड या आयुक्तांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून पोलिस ठाण्यात योग्य प्रतिसाद न मिळाल्यास नागरिक थेट आयुक्तांना भेटण्यास येतात. त्यामुळे आता ठाण्यात अधिकाऱ्यांसह कर्मचारीही नागरिकांना चांगली वागणूक देत असल्याचे सांगितले जाते.

गैरप्रकारांना बसणार आळा

निवडणूक काळात मतदारांवर दबाव टाकण्यासाठी किंवा त्यांना विविध प्रलोभने, पैसे वाटप करण्यासाठी राजकीय पुढारी सराईत गुन्हेगारांचा वापर करतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत असे प्रकार होऊ नयेत. यासाठी पोलिसांकडून कडक कारवाईचे धोरण राबवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीतील टॉप टेन गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. 15 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दहा अशा एकूण 150 गुन्हेगारांवर कारवाई केली जाणार आहे.

रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड