आदिवासींच्या समस्यांवर ‘अस्थीरवासी’ लघुचित्रपटाची निर्मिती 

0
967

मुळशी, दि. ३० (पीसीबी) – आदिवासी समाजाच्या समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या स्टुडिओ अमोल निर्मित अमोल मोरे दिग्दर्शित ‘अस्थीरवासी’ या लघुचित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच कोळवण (ता. मुळशी) येथे पार पडले.

या लघुपटात कलाकार धनश्री घोडे, सुनील साखरशेटे, शिवाजी घोडे तसेच ज्या समाजावर हा लघुचित्रपट बनवला आहे. त्या आदिवासी समाजातील सखाराम वाघमारे, मंदा वाघमारे, मंजू वाघमारे, तुकाराम वाघमारे, कमल वाघमारे, विठाबाई वाघमारे, मंदा रोकडे, फुलाबाई घोगरे, हिराबाई पवार, ताराबाई मोरे, विमल मोरे, आणि  माधव मोरे या  सगळ्यांनी लघुचित्रपटासाठी विशेष परिश्रम घेतले. निर्मिती व्यवस्थापन बाळासाहेब गायकवाड आणि मधुरा देशमुख, छायाचित्रण ऋतिक बनकर यांनी केले.

दिग्दर्शक मोरे म्हणाले कि, हि व्यथा चार- पाच घरांची नाही तर देशभरात असंख्य घरांची आणि त्यात राहणारे त्या लोकांची आहे. ज्यांची ओळखच नाही. अनेक समस्या आणि अडचणींना सामोरे जात आहे. हा समाज पिढ्या न पिढ्या अनेक सुविधांपासून वंचित राहिला. थोडक्यात सांगायचे  तर  अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शिक्षण इत्यादी सुविधांसाठी आजही संघर्ष करत आहे. परंतु या लोकांचा सर्वांत मोठा संघर्ष आज सुद्धा सुरु आहे आणि तोच म्हणजेच  स्वतःची ओळख. ज्यांना आपण “अस्थिरवासी” म्हणता येईल. आधुनिक भारतात त्यांच्या आयुष्यात आजही अस्थैर्य आहे.

स्टुडिओच्या  टीम ने ९  महिने या आदिवासी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या लघु चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी राबविण्यात आलेल्या  देणगी उपक्रमातुन गळत्या घरांसाठी फ्लेक्स, स्त्रियांसाठी साड्या तर लहान मुलांना  कपडे देवून मदतीचा हात दिला. फक्त एवढेच नाही तर त्याच पाड्यावरच्या नागरिकांना घेऊन स्टुडिओ अमोलने अस्थिरवासी (WITHOUT AN IDENTITY) नावाचा लघुचित्रपट निर्मित  केला. तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या लघुचित्रपटात अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शिक्षण आणि स्वतःची ओळख अशा मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. अस्थिर असलेल्या आदिवासी समाजासाठी यापुढे हि असेच कार्य करीत राहणार असल्याचे दिग्दर्शक अमोल मोरे यांनी सांगितले.