हिमालय पूल हा अति गंजल्यानेच कोसळला

0
396

मुंबई, दि.३१ (पीसीबी) – शिवाजी छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकाबाहेरचा हिमालय पूल हा अति गंजल्यानेच कोसळला, असा अहवाल वीर जिजाबाई अभियांत्रिकी संस्थेने (व्हीजेटीआय) सादर केला आहे. पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र सादर केले. त्यात या अहवालाचा समावेश आहे.

पालिकेचे तीन अधिकारी आणि एका खासगी संरचनात्मक पाहणी कंपनीच्या प्रमुखाला पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी अटक केली आहे. पूल दुर्घटनेनंतर पोलिसांनी ‘व्हीजेटीआय’ला पूल कोसळण्याची कारणमीमांसा करण्यास सांगितले होते. पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी ३०६ पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर करताना त्यात ‘व्हीजेटीआय’च्या अहवालाचा प्रामुख्याने दाखला दिला. या अहवानुसार, पूल अति गंजला होता, पुलाच्या लोखंडाची जाडी गंजामुळे कमी झाली होती. तो कोसळण्यामागे हेही प्रमुख कारण होते.

आरोपींमध्ये पालिकेच्या पूल विभागाचे कार्यकारी आणि साहाय्याक अभियंता अनिल पाटील, एस. एफ. काळकुते यांच्यासह पालिकेचे माजी मुख्य अभियंता शीतलाप्रसाद कोरी आणि पुलाची संरचनात्मक पाहणी करणाऱ्या कंपनीचा प्रमुख नीरज देसाई यांचा समावेश आहे. पुरवणी आरोपपत्रानुसार, ऑक्टोबर २०१६ मध्ये तत्कालिन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पुलाला भेट दिली होती. स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत या पुलाचे सुशोभीकरणाचे आदेश दिले होते. त्याबाबतचे पत्र पाटील यांना पाठवण्यात आले होते. त्यात सुशोभीकरणाचे काम करण्याआधी पुलाची संरचनात्मक पाहणी करण्यास सांगण्यात आले आहे. परंतु पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अभियंत्यांनी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर पुलाची पाहणी करणे अनिवार्य आहे. परंतु आरोपींनी ते काम केलेच नाही. कोरी यांनीही आवश्यक ती पाहणी केली नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.